पंतप्रधानांचे उद्गार : सोने आयातीत जगभरात भारत दुसऱ्या क्रमांकावरमुंबई : सोने म्हणजे सुरक्षितता अशी लोकांची मानसिकता असून, यामुळे लोक गरजेपेक्षा जास्त सोनेखरेदी करत आहेत. परंतु, अतिरिक्त सोन्याची खरेदी ही देशाच्या अर्थव्यवस्थेसाठी चिंतेची बाब आहे. सोनेखरेदीसंदर्भातील ही मानसिकता न बदलली गेल्यास आणि ही अतिरिक्त खरेदी न रोखली गेल्यास याचा विपरित दूरगामी परिणाम देशाच्या अर्थव्यवस्थेवर होऊ शकतो, असा स्पष्ट इशारा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी येथे दिला. खाजगी क्षेत्रातील अग्रगण्य बँक म्हणून ओळख असलेल्या आयसीआयसीआय बँकेला ६० वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त आयोजित कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. पंतप्रधान मोदी म्हणाले, आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती कमी झाल्याने इंधनावरील आयात खर्चात कपात झाली असली तरी सोन्याची आयात आणि खरेदी हा सरकारच्या दृष्टीने डोकेदुखीचा मुद्दा आहे. जगात सोन्याच्या आयातीत दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या भारतामध्ये सोन्यामुळे अर्थव्यवस्थेवर येणारा ताण कमी करण्यासाठी अनेक पाऊले उचलण्यात आली आहेत. मात्र, तरीही सरत्या वर्षात देशात जवळपास ८५० टन सोन्याची आयात झाली आहे. यासंदर्भात आर्थिक विश्लेषण संस्थांनी इशारेही दिले आहेत. या पार्श्वभूमीवर सोन्याच्या खरेदीमुळे अर्थव्यवस्थेवर ताण येत असल्याचे पंतप्रधानांनी केलेले वक्तव्य महत्त्वाचे मानले जात आहे. (प्रतिनिधी)भटक्या जनतेचेही जन-धन खाते उघडणार - मुख्यमंत्रीकेंद्र सरकारने सादर केलेल्या जन-धन योजनेत महाराष्ट्राने आपले लक्ष्य पूर्ण केल्याची माहिती देतानाच, आता या योजनेची व्याप्ती वाढविण्याची घोषणा मुख्यमंत्री फडणवीस यांनी केली. राज्यात जो समाज सातत्याने भटकंतीवर असतो, अशा लोकांनाही वित्तीय सुविधेचा लाभ मिळण्याच्या दृष्टीने राज्य सरकार प्रयत्न करणार असून या लोकांचे जन-धन योजनेअंतर्गत बँक खाते उघडले जाईल, अशी घोषणा त्यांनी केली.एक लाख स्वच्छता उद्योजक बँकांनी निर्माण करावेत उद्योगांना ज्या प्रमाणे वित्त सहाय्य दिले जाते, त्याचप्रमाणे या उद्योगालाही वित्तसहाय्य देऊन प्रकल्प उभारणीत बँकांनी मदत करावी. आगामी वर्षात देशात किमान एक लाख स्वच्छता उद्योजकांची निर्मिर्ती बँकांनी करण्याचे आवाहन मोदी यांनी केले.एटीएम बँकिंग सोन्यासारखा पर्यायमुंबई : सोने घरात असणे म्हणजे मध्यरात्रीदेखील पैशाची गरज भासल्यास मिळू शकतील, ही मानसिकता बदलण्यासाठी बँकांनी आपले एटीएम मशीनचे नेटवर्क खेड्यापाड्यातून उपलब्ध करून दिले पाहिजे. यामुळे कधीही पैसे लागले तरी त्या मशीनच्या माध्यमातून आपल्याला मिळू शकतील, हा विश्वास लोकांच्या मनात निर्माण होईल आणि याचा परिणाम सोन्याच्या खरेदीतीत कपातीच्या रुपाने दिसू शकेल, असे मत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी व्यक्त केले. आयसीआयसीआय बँकेला ६० वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली उपस्थित होते. बँकेने या कार्यक्रमाच्या निमित्ताने गुजरातमधील साबरकंठा जिल्ह्णातील अकोदरा या गावाला देशातील पहिले डिजिटल गाव म्हणून विकसित केले. याचा राष्ट्रार्पण सोहळाही मोदी यांच्या हस्ते झाला. या गावातील सर्व व्यवहार आता इंटरनेटच्या माध्यमातून होणार असून, मुख्य वैशिष्ट्य म्हणजे कॅशलेस अर्थात रोखीने कोणतेही व्यवहार होणार नाहीत. ग्राहकाचा प्रत्येक व्यवहार त्याच्या बँक खात्याद्वारे थेट होईल. याचाच धागा पकडून मोदी यांनी देशात सर्वत्र अशी व्यवस्था निर्माण करण्याची गरज व्यक्त करतानाच कॅशलेस व्यवहारांमुळे काळ््यापैशाला मोठ्या प्रमाणावर चाप बसेल, असा विश्वासही व्यक्त केला. जेटली म्हणाले की, जागतिक अर्थकारणाच्या तुलनेत भारतीय अर्थव्यवस्थेने कलाटणी मिळतील, अशा अनेक संधी गमावल्या आहेत. परंतु, आता तसे करणे परवडणारे नाही. त्यामुळे सरकारच्या विविध योजनांत बँकिंग उद्योगानेही सक्रिय होत हातभार लावायला हवा. बँकेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी चंदा कोचर यांनी बँकेच्या कामगिरीचा आढावा सादर केला. कार्यक्रमाला आर्थिक क्षेत्रातील दिग्गज उपस्थित होते. (प्रतिनिधी)
अतिरिक्त सोने खरेदी देशाला घातक!
By admin | Published: January 03, 2015 2:19 AM