लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : शासकीय प्रकल्पांसाठी संपादित करण्यात येणाऱ्या जमिनी शेतकऱ्यांकडून कवडीमोल दरात खरेदी करायच्या आणि सरकारकडून येणारा पाचपट मोबदला लाटायचा प्रकार राज्यात राजरोस सुरू आहे. या प्रकाराला आळा घालण्यासाठी उपाययोजना करण्यात यावी, अशी भावना शुक्रवारी विधान परिषदेत दोन्ही बाजूच्या आमदारांनी व्यक्त केली.
शिवसेनेचे रवींद्र फाटक यांनी ठाणे जिल्ह्यातील टिटवाळा परिसरातील दोन हजार चाळींचा मुद्दा उपस्थित केला. पुणे-बडोदा महामार्गासाठी या चाळी बाधित होत असून, चाळकऱ्यांनी आपली घरे प्रकल्पासाठी देण्यास सहमती दिली आहे. मात्र, प्रकल्पबाधित चाळकऱ्यांना मिळणारा मोबदला जागामालक हिरावून घेत असल्याची तक्रार त्यांनी यावेळी केली. यावेळी झालेल्या चर्चेत विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी पुणे-बडोदा महमार्गाकरिता भूसंपादित करण्यात आलेल्या जमिनी शासकीय अधिकाऱ्यांच्या नातेवाईकांनी खरेदी केल्याचा आरोप केला. प्रकल्पाच्या अवतीभोवती गरिबांच्या जमिनी कवडीमोल किमतीमध्ये घेऊन शासनाकडून मिळणारा पाचपट मोबदला लाटण्यात येत असल्याचा आरोप सदस्यांनी केला. तर, राष्ट्रवादी काँग्रेसचे शशिकांत शिंदे यांनी समृद्धी महामार्गात अशा प्रकारे भूसंपादन झाल्याचा आरोप केला. शेतकरी कामगार पक्षाचे जयंत पाटील यांनी राज्यातील काही प्रकल्पातील जमिनी दिल्ली आणि पंजाब येथील लोकांनी विकत घेतल्या असल्याचे सभागृहाच्या निदर्शनास आणले.
टिटवाळ्यातील चाळींना मिळणार घराचा मोबदला
या चर्चेला उत्तर देताना महसूल मंत्री बाळासाहेब थोरात म्हणाले की, पुणे-बडोदा महामार्गाकरिता टिटवाळा परिसरातील बाधित चाळकऱ्यांना मोबदला देण्याची कार्यवाही सुरू आहे. चाळधारकांना गुणवत्तेनुसार पडताळणी करून घराचा मोबदला देण्यात येणार आहे. पुणे-बडोदा महामार्गाच्या भूसंपादन प्रकरणी उपविभागीय अभियंता तसेच सार्वजनिक बांधकाम विभाग कल्याण यांच्याकडे मूल्यांकन प्राप्त झालेले आहे. या बांधकामाचा मोबदला देण्यापूर्वी संबंधित जागामालक, बांधकाम करणारे बांधकाम विकासक आणि चाळीतील घर विकत घेणारे यांचे नाहरकत दाखले व हमीपत्र घेऊन कार्यवाही करण्यात येत आहे. तसेच चाळधारकांना पडताळणी करून घराचा मोबदला देण्यात येत असल्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी सांगितले.