आरोग्य, वैद्यकीय विभागामुळे रखडली औषध खरेदी; हाफकिनला दिले खरेदीचे आदेश
By अतुल कुलकर्णी | Published: October 7, 2018 01:37 AM2018-10-07T01:37:19+5:302018-10-07T01:45:10+5:30
हाफकिन महामंडळाने सुरू केलेल्या औषध खरेदीत सार्वजनिक आरोग्य आणि वैद्यकीय विभागाने अडथळे आणल्यामुळे औषधांची खरेदी रखडली असून, औषधाविना राज्यातील सरकारी रुग्णालयेच ‘व्हेंटिलेटर’वर आहेत.
मुंबई : हाफकिन महामंडळाने सुरू केलेल्या औषध खरेदीत सार्वजनिक आरोग्य आणि वैद्यकीय विभागाने अडथळे आणल्यामुळे औषधांची खरेदी रखडली असून, औषधाविना राज्यातील सरकारी रुग्णालयेच ‘व्हेंटिलेटर’वर आहेत.
हाफकिनने सुरू केलेल्या खरेदीत अडथळे आणून औषधांची टंचाई निर्माण झाली, असे कारण दाखवत स्थानिक पातळीवर औषध खरेदीचे अधिकार दिले पाहिजेत, असा आग्रह मुख्यमंत्र्यांकडे धरला जात असून, या दुष्टचक्रात सध्या राज्याची औषध खरेदी रखडली आहे.
आरोग्य आणि वैद्यकीय विभागाने हाफकिनकडे औषधांची मागणी केली खरी, परंतु निविदा अंतिम केल्यानंतर ती औषधे कोणत्या आरोग्य केंद्रात किती पाठवायची आहेत, याची यादीच दिलेली नाही. यात सहा महिन्यांचा कालापव्यय झाल्याने सरकारी रुग्णालयांना वेळेवर औषध पुरवठा होऊ शकलेला नाही.
हिमोफिलीया आजारावरील औषधासाठी हाफकिनने जूनमध्ये निविदा प्रसिद्ध केली, पण त्याच वेळी सार्वजनिक आरोग्य विभागात याच औषधासाठीची स्वतंत्र निविदा अस्तित्वात होती. त्यामुळे त्यांनी हाफकिनची निविदा रद्द करायला लावली. त्यानंतर स्वत:ची निविदादेखील त्यांनी रद्द केली आणि ईएसआयसीच्या दरकरारावर या औषधांचा १० कोटी रुपयांचा साठा खरेदी करण्याचा प्रस्ताव पुन्हा हाफकिनला पाठविण्यात आला. हे एकदा नाही, तर तब्बल दोन वेळा घडले.
सलाइनच्या बाबतीत तर वेगळाच प्रकार आहे. १ आॅगस्ट रोजी ३३ कोटींची सलाइन घेण्याचा प्रस्ताव हाफकिनकडे आला. त्यांच्या निविदापूर्व बैठकीत या प्रस्तावावर काही प्रश्न उपस्थित केले गेले व ते प्रश्न आरोग्य विभाग आणि वैद्यकीय शिक्षण विभागाला पाठविले गेले, पण अद्याप त्याची उत्तरेच दिली गेली नाहीत.
आता तसे होत नाही
आरोग्य विभागाचे खरेदीचे सहसंचालक डॉ. नितीन आंबाडेकर यांना विचारले असता, ते म्हणाले, आम्ही याद्या पाठविल्या आहेत. हिमोफिलीयाचा विषय माझ्याशी संबंधित नाही, सलाइनच्या बाबतीत काय झाले ते माहिती घ्यावी लागेल. आधी काही गोष्टी घडल्या असतील, पण आता तसे होत नाही, असे त्यांचे म्हणणे होते.