मुंबई : आणि वैद्यकीय उपकरणांची खरेदी, आता हाफकिन बायो-फार्मास्युटिकल्स कॉर्पोरेशन लि. मार्फत करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. यासाठी हाफकिनमध्ये स्वतंत्र कक्षदेखील कार्यान्वित करण्यात आल्याची माहिती आरोग्य विभागामार्फत देण्यात आली.राज्यात आरोग्य विभाग, वैद्यकीय शिक्षण विभाग, स्थानिक स्वराज संस्थांची रुग्णालये, तसेच आरोग्य संस्थांसाठी लागणारी औषधे व वैद्यकीय उपकरणांची खरेदीसंबंधित संस्थांमार्फत केली जात असे. वेगवेगळ्या विभागांकडून खरेदी होत असल्याने, अनेकदा एकाच प्रकारच्या औषधे, उपकरणे व साधन सामुग्रीच्या दरांमध्ये व मानांकनामध्ये फरक आढळून येत. हा फरक दूर करून खरेदीमध्ये एकसूत्रता आणण्यासाठी महामंडळ स्थापन करण्याची हमी, राज्य सरकारने उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात सुरू असलेल्या याचिकेच्या सुनावणीदरम्यान दिली होती. त्यानुसार, सार्वजनिक आरोग्य विभाग, वैद्यकीय शिक्षण विभाग आणि शासनाच्या अन्य विभागाच्या अधिपत्याखालील आरोग्य संस्थांसाठी लागणारी औषधे व वैद्यकीय उपकरणांची खरेदी हाफकिन बायोफार्मास्युटिकल्स कॉपोर्रेशन लि. यांच्याकडून करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.ही खरेदी प्रक्रिया राबविण्यासाठी हाफकिन बायो-फार्मास्युटिकल्स कॉर्पोरेशन लि. अंतर्गत स्वतंत्र कक्ष स्थापन करण्यात आला आहे. अलीकडे त्याचे उद्घाटन करण्यात आले आहे. आरोग्य विभागामार्फत या कामासाठी आवश्यक कर्मचाºयांची नियुक्ती करण्यात आल्याचे आरोग्य विभागाने स्पष्ट केले आहे.
सार्वजनिक आरोग्य विभाग तसेच शासनाच्या सर्वच आरोग्य संस्थांसाठी लागणाऱ्या औषधांची हाफकिनमार्फत होणार खरेदी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 21, 2017 5:24 AM