मुंबई : देशाच्या रिअल इस्टेटमध्ये २०२३ मध्ये मोठ्या प्रमाणावर उलाढाल झाली असून मुंबईसह महामुंबई, दिल्ली, बंगळुरू, हैदराबाद, चेन्नई, पुणे आणि कोलकाता येथे एकूण २०७७ एकर जागा प्रामुख्याने गृहनिर्माणासाठी खरेदी करण्यात आली आहे. बांधकाम क्षेत्राशी निगडीत घडामोडींचा अभ्यास करणाऱ्या ॲनारॉक कंपनीच्या सर्वेक्षणाद्वारे ही माहिती पुढे आली आहे.
यानुसार, एकूण २७०७ एकर जागेसाठी देशातील वर नमूद शहरात एकूण ९७ करार झाले आहेत. यामधील बहुतांश जमिनीवर घरांची निर्मिती होणार असून काही भूखंडांवर कार्यालयीन इमारतींची देखील निर्मिती होणार आहे. गेल्यावर्षी विक्री झालेल्या या जमिनींमध्ये अव्वल क्रमांक महामुंबई परिसराने पटकवला असून येथे जागा खरेदीचे एकूण २५ व्यवहार झाले असून त्याद्वारे २८९ एकर जमीन प्राप्त झाली आहे.
लहान शहरांमध्येही जोरदार खरेदी
काही प्रमुख द्वितीय श्रेणी शहरांतूनही मोठ्या प्रमाणावर जमीन खरेदीचे व्यवहार झाले आहेत. यामध्ये नागपूर, लुधियाना, मैसूर, सानंद, दहेज आदी शहरांत १० व्यवहार झाले असून याद्वारे ६४६ एकर जमीन ताब्यात घेण्यात आली आहे. गुजरातमधील अहमदाबाद शहरात तीन व्यवहार झाले असून याद्वारे ७४० एकर जमीन ताब्यात घेण्यात आली आहे. दरम्यान, २०२२ या वर्षामध्ये देशातील प्रमुख शहरांतून जमीन खरेदीचे एकूण ८२ व्यवहार झाले होते व त्याद्वारे २५०८ एकर जमीन ताब्यात घेण्यात आली होती. त्या तुलनेमध्ये २०२३ मध्ये या संख्येत वाढ झाली आहे.
बंगळुरू, चेन्नई, पुणे व कोलकात्ता या शहरांनी नंबर प्राप्त केला आहे. या सर्व शहरांची गणना प्रथम श्रेणी शहरात होते. या २७०७ एकर जागेपैकी १९४५ एकरपेक्षा जास्त जागेवर गृहनिर्मिती होणार आहे. तर, ५६४ एकर जागेवर व्यावसायिक कार्यालये, आयटी पार्क, उत्पादन क्षेत्रातील कंपन्या आदींची उभारणी होणार असल्याची माहिती आहे.