गेल्या वर्षी पालिकेकडून ४५ लाख झेंड्यांची खरेदी
By ऑनलाइन लोकमत | Published: August 14, 2023 12:27 PM2023-08-14T12:27:02+5:302023-08-14T12:27:17+5:30
स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवाच्या समारोपानिमित्त देशभरात ‘माझी माती, माझा देश’ हे अभियान राबविण्यात येत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवाच्या समारोपानिमित्त देशभरात ‘माझी माती, माझा देश’ हे अभियान राबविण्यात येत आहे. पालिकेच्या वतीनेही हे अभियान राबविले जात आहे. गेल्यावर्षी पालिकेने ४४ लाख ५० हजार ५२० राष्ट्रध्वज स्वतः खरेदी करून, मुंबईकरांना मोफत दिले होते. हेच ध्वज घरोघरी तिरंगा उपक्रमासाठी परत वापरावेत, असे आवाहन पालिकेने केले आहे.
गेल्यावर्षी ‘हर घर तिरंगा’ अर्थात ‘घरोघरी तिरंगा’ उपक्रमासाठी पालिकेच्या वतीने गेल्या ४४ लाख ५० हजार ५२० राष्ट्रध्वज मुंबईकरांसाठी खरेदी केले होते. यंदा ज्या नागरिकांकडे राष्ट्रध्वज उपलब्ध नाहीत, त्यांच्यासाठी शासनाने भारतीय डाक विभागाच्या माध्यमातून मुंबईमध्ये २२४ डाक कार्यालयात त्याचप्रमाणे अधिकृत विक्रेते, मुख्य अशी ५ रेल्वे स्थानके आदी ठिकाणी ध्वज खरेदीची व्यवस्था करून दिलेली आहे. १४ आणि १५ ऑगस्ट या दिवशी नागरिकांना आपल्या घरी/इमारतीवर दिवसा व रात्री (अखेरच्या दिवशी सूर्यास्तापर्यंत) राष्ट्रध्वज फडकवता येईल. मात्र, सर्व शासकीय कार्यालयांच्या इमारती, तसेच अंगणवाड्या, शाळा, रुग्णालये यासह सर्व शासकीय संस्थांवर राष्ट्रीय ध्वज संहितेनुसार फक्त दिवसा ध्वज फडकवावा, असे आवाहन पालिकेने केले आहे.