‘हाफकिन’मार्फत औषध खरेदी थांबणार; वैद्यकीय वस्तूंची खरेदी लवकरच प्राधिकरणामार्फत होणार
By ऑनलाइन लोकमत | Published: July 12, 2023 08:52 AM2023-07-12T08:52:54+5:302023-07-12T08:53:19+5:30
मुख्यत्वे राज्याच्या महिला बाल कल्याण विभाग, सार्वजनिक आरोग्य विभाग आणि वैद्यकीय शिक्षण विभागासाठी लागणारी औषधे आणि वैद्यकीय वस्तूंची खरेदी गेल्या काही वर्षांपासून हाफकिनमार्फत करण्यात येत होती.
मुंबई : औषध खरेदी प्रकरणी टीकेचे धनी झालेल्या हाफकिन मंडळामार्फत वैद्यकीय वस्तू आणि औषधांची खरेदी थांबविण्यात येणार आहे. आणखी १५ ते २० दिवस हाफकिनमार्फत खरेदी करण्यात येईल. त्यानंतर सर्व औषध आणि वैद्यकीय वस्तूंची खरेदी नव्याने स्थापन केलेल्या महाराष्ट्र वैद्यकीय वस्तू खरेदी प्राधिकरणामार्फत करण्यात येणार आहे. मे मध्ये हे प्राधिकरण स्थापन झाले होते.
मुख्यत्वे राज्याच्या महिला बाल कल्याण विभाग, सार्वजनिक आरोग्य विभाग आणि वैद्यकीय शिक्षण विभागासाठी लागणारी औषधे आणि वैद्यकीय वस्तूंची खरेदी गेल्या काही वर्षांपासून हाफकिनमार्फत करण्यात येत होती. गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये राज्यातील या दोन्ही विभागांच्या सर्वच रुग्णालयांत वेळेत औषध खरेदी न झाल्यामुळे औषधटंचाई निर्माण झाली होती. वैद्यकीय वस्तूंची खरेदी वेळेत न झाल्यामुळे कोट्यवधींचा निधी परत गेला. त्यावर हिवाळी अधिवेशनात चर्चा झाली होती.
या गोंधळानंतर वैद्यकीय शिक्षण विभाग आणि सार्वजनिक आरोग्य विभागांनी परस्पर औषध खरेदी करण्याचे प्रयत्न केले. त्याचा वाद मंत्र्यांच्या दालनात पोहोचला. अखेर वाद थांबण्यासाठी शासनाने या खरेदीसाठी स्वतंत्र महाराष्ट्र वैद्यकीय वस्तू खरेदी प्राधिकरणाची घोषणा केली.. त्यामुळे हाफकिनकडून होणारी खरेदी आता या प्राधिकरणामार्फत करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
महाराष्ट्र वैद्यकीय वस्तू खरेदी प्राधिकरणाच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी सनदी अधिकाऱ्यांची नेमणूक करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच या प्राधिकरणाला मनुष्यबळही देण्यात येणार आहे. आरोग्य विभागाने या प्राधिकरणात नेमण्यात येणारे अधिकारी, कर्मचारी आणि कंत्राटी कर्मचारी यांचा पगार, भत्ते व आस्थापनाविषयक खर्च भागविण्यासाठी नुकतीच प्रशासकीय मान्यता दिली आहे.
मे २०२३ मध्ये हे प्राधिकरण स्थापन झाले असून, त्याचे काम येत्या काही दिवसांत सुरू होणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.