मुंबई मनपाकडून डासांची अंडी, अळी खाणाऱ्या १९ हजार यंत्रांची खरेदी
By ऑनलाइन लोकमत | Published: November 29, 2023 09:17 AM2023-11-29T09:17:27+5:302023-11-29T09:17:43+5:30
एक यंत्र ६६० रुपयांना; मलेरिया, डेंग्यूला बसणार आळा.
मुंबई : डासांचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी विशिष्ट तंत्रज्ञान वापरण्याचे मुंबई महापालिकेने जाहीर केले होते. त्यानुसार १९ हजार बायो ट्रूप उपकरणाची खरेदी केली जाणार आहे. काही भागात या उपकरणाचा प्रयोग करण्यात आला होता. हा प्रयोग यशस्वी झाल्यानंतर मुंबईत विविध भागांत ही उपकरणे बसवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
जीवघेण्या डेंग्यू, मलेरियाचे आजार फैलावणाऱ्या डासांना या उपकरणाद्वारे प्रसाराआधीच नामशेष केले जाणार आहे. उपकरणातील औषधाच्या माध्यमातून डासांना आकर्षित केले जाईल. या ठिकाणी डासांनी अंडी घातली तरी त्यांचे रूपांतर अळी-कोश आणि डासामध्ये न होता ती नष्ट होतील. ज्यामुळे डासांच्या पैदासीलाच आळा बसेल.
इन्सेक्ट ग्रोथ पावडर :
इको बायो ट्रॅप उपक्रमात डासांची उत्पत्ती होऊ शकणाऱ्या संभाव्य ठिकाणी कुंड्या बसवल्या जातील. यामध्ये पाण्यात डास आकर्षित करणारी इन्सेक्ट ग्रोथ पावडर मिक्स केली जाईल. या ‘आयजीआर’ पावडरमुळे डासांनी अंडी घातली तरी ती नष्ट होतील. त्यापासून उडणारे डास निर्माण होऊ शकणार नाहीत. या कुंड्यांमध्ये एक महिन्याने पावडरचे पाणी बदलावे लागेल.
यशस्वी प्रयोगानंतर उपकरणे खरेदी :
या तंत्रज्ञानाचा प्रयोग प्रायोगित तत्त्वावर A जी, उत्तर वरळी विभागात होईल. ACकुंभारवाडा, अण्णा नगर, मुस्लीम नगर, धारावी बस आगार, राजीव गांधी सरकारी क्रीडा संकुल, धारावी, माहीम फाटक, सोचपल व इंदू मिल आवार, गोखले मार्ग, भवानी शंकर महापालिका शाळा, दादर अशा ठिकाणांवर १८ ठिकाणी या कुंड्या बसवण्यात आल्या होत्या.
तेथील यशस्वी प्रयोगानंतर १९ हजार उपकरणे खरेदी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. प्रति उपकरणांसाठी ६६० रुपये खर्च आहे. प्रकल्प व्यवस्थापन, देखभाल खर्च आणि विविध कर मिळून तीन कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत.