मुंबई : खिचडी घोटाळाप्रकरणी आरोपी असलेले उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे पदाधिकारी सूरज चव्हाण यांनी गुन्ह्याच्या पैशांतून मालमत्ता खरेदी केली आणि काही पैसे दुग्ध व्यवसायात गुंतविले, असा दावा ईडीने विशेष पीएमएलए न्यायालयात सोमवारी केला.
कोरोनाच्या काळात स्थलांतरितांना खिचडी वाटपातील कथित अनियमिततेशी संबंधित मनी लाँड्रिंगप्रकरणी सूरज चव्हाण यांना विशेष न्यायालयाने २५ जानेवारीपर्यंत ईडी कोठडीत वाढ केली. ठाकरे गटाच्या युवा सेनेच्या कोअर कमिटीचे पदाधिकारी चव्हाण यांना १७ जानेवारी रोजी अटक करण्यात आली. सोमवारी चव्हाण यांची ईडी कोठडी संपली. सात दिवस त्यांच्या कोठडीत वाढ करण्याची विनंती ईडीने न्यायालयाला केली. संबंधित गुन्ह्यात आरोपीने महत्त्वाची भूमिका बजावली आहे, असे ईडीने म्हटले.
ईडीचा दावा
चव्हाण यांची खिचडी पुरविण्यात काहीही भूमिका नसताना त्यांना १.५३ कोटी रुपये देण्यात आले. बेकायदेशीरपणे कमावलेल्या नफ्यातून चव्हाण यांना रक्कम वळती करताना ते २०१९-२० मध्ये फर्मचे कर्मचारी असल्याचे दाखविण्यात आले आणि त्यांना देण्यात आलेली रक्कम ‘वेतन’ म्हणून दाखविण्यात आली. या पैशांतून मालमत्ता व शेतजमीन खरेदी करण्यात आली. बेकायदेशीरीत्या अटक केल्याचा दावा करत चव्हाण यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. न्या. प्रकाश नाईक यांच्या एकलपीठापुढे या याचिकेवर सोमवारी सुनावणी सुरू होती. चव्हाण यांना दुसऱ्यांदा देण्यात आलेल्या ईडी कोठडीच्या आदेशाची प्रत उपलब्ध नसल्याने चव्हाण यांच्या वकिलांनी याचिकेत सुधारणा करण्याची परवानगी मागितली. न्यायालयाने तशी परवानगी देत २९ जानेवारी रोजी पुढील सुनावणी ठेवली.