पालिका विद्यार्थ्यांसाठी तिप्पट किमती मास्कची खरेदी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 15, 2021 04:07 AM2021-01-15T04:07:11+5:302021-01-15T04:07:11+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : शाळा सुरू करण्याबाबत कोणताही निर्णय झाला नसताना महापालिका तब्बल ८० लाख मास्क खरेदी करणार ...
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : शाळा सुरू करण्याबाबत कोणताही निर्णय झाला नसताना महापालिका तब्बल ८० लाख मास्क खरेदी करणार आहे. विशेष म्हणजे गेल्या वर्षी राज्य सरकारने एका मास्कची किमत चार रुपये निश्चित केली होती. मात्र, पालिका यासाठी १२ रुपये मोजणार असल्याने या खरेदीबाबत विरोधी पक्षांनी संशय व्यक्त केला आहे. त्यामळे मास्क घेण्याचा प्रस्ताव अडचणीत आला आहे.
महापालिकेच्या शाळांमध्ये सव्वातीन लाख मुले आहेत. त्यांच्यासाठी खरेदी करण्यात येणारे मास्क धुवून किमान ३० वेळा वापरता येणार आहेत. त्यामुळे एक मास्क महिनाभर वापरता येऊ शकतो, असा पालिकेचा दावा आहे. याकरिता २० कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहेत. मात्र, अनेकवेळा धुतल्यानंतर तो मास्क वापरण्यायोग्य राहणार नाही. जनतेच्या पैशांची ही लूट असल्याचा आरोप विरोधी पक्षनेते रवी राजा यांनी केला आहे.
महापालिकेने थ्री लेयर मास्कसाठी निविदा मागविल्या होत्या. मात्र, एक मास्क ३० वेळा धुतल्यानंतरही खराब होणार नाही, याचे प्रमाणपत्र निविदाकराकडे असावे, अशी अट निविदेमध्ये टाकण्यात आली होती. या मास्कसाठी महापालिका तिप्पट रक्कम मोजणार असल्याने काँग्रेस आणि समाजवादी पक्षाने आक्षेप घेतला आहे. यापूर्वी कोविड काळात मृतदेहांसाठी बॉडी बॅग, कर्मचाऱ्यांसाठी पीपीई सूट, सॅनिटायझर आणि मास्क खरेदीबाबत सवाल उपस्थित करण्यात आला होता.
* शैक्षणिक वर्षात किमान १० मास्कची आवश्यकता आहे. पण या मुलांना प्रत्येकी २५ मास्क दिले जाणार आहेत. म्हणजे पुढील दोन वर्षांचे मास्क आताच खरेदी करून, त्यावर कोट्यवधी रुपये खर्च केले जाणार आहेत.
* कोविड काळात महापालिकेने केलेल्या सर्व खरेदीमध्ये घोटाळा झाल्याचा आरोप भाजपने केला आहे. मात्र, वारंवार मागणी करूनही प्रशासन या खर्चाचा हिशोब सादर करीत नसल्याने लेखा परीक्षकांमार्फत या खर्चाच्या चौकशीचे आदेश स्थायी समितीने दिले आहेत.