भाड्याच्या दरात झाली असती खरेदी; कोविड सेंटरच्या कंत्राटाबाबत भाजपाची लोकायुक्तांकडे तक्रार
By ऑनलाइन लोकमत | Published: July 2, 2020 01:38 AM2020-07-02T01:38:31+5:302020-07-02T01:40:14+5:30
या सेंटरसाठी ९० दिवसांकरता ज्या वस्तू भाड्याने घेण्यात आल्या त्यांचे दर पाहता त्या खरेदी करणे परवडले असते याकडे साटम यांनी लक्ष वेधले आहे.
मुंबई : मुंबई महापालिकेने नेस्को गोरेगाव येथे कोविड सेंटर उभारण्याचे कंत्राट कुठलाही अनुभव नसलेल्या एका बिल्डरला देण्यात आल्याचा आरोप भाजपचे आमदार अमित साटम यांनी केला असून या कामात अनियमितता झाल्याची तक्रार त्यांनी राज्याच्या लोकायुक्तांकडे केली आहे.
हे कंत्राट रोमेल रिअल्टर्स यांना देण्यात आले त्यात सेंटरची उभारणी, बेडस, आॅक्सिजन सिलिंडरसह वैद्यकीय उपकरणांचा पुरवठा यांचा समावेश होता. त्यासाठी निविदा मागवण्यात आली नाही. एका बिल्डरला हे कंत्राट देण्याचे कारण काय अशी विचारणा महापालिकेकडे केली असता त्यांनी ते त्या भागात काम करतात त्यामुळे कंत्राट दिल्याचा अजब खुलासा केला. या बिल्डर कंत्राटदाराला चढ्या किमतीने कंत्राट दिल्याचे निदर्शनास येते. त्यांना अशा कामाचा कुठलाही अनुभव नाही. दिलेल्या कंत्राटात पारदर्शकता नाही असे साटम यांनी या तक्रारीत म्हटले आहे.
या सेंटरसाठी ९० दिवसांकरता ज्या वस्तू भाड्याने घेण्यात आल्या त्यांचे दर पाहता त्या खरेदी करणे परवडले असते याकडे साटम यांनी लक्ष वेधले आहे. एक हजार प्लास्टिक खुर्च्यांसाठी साडेचार लाख रुपये मोजले जात आहेत. दीडशे लाकडी टेबलसाठी ६ लाख ७५ हजार रुपये, २ हजार पंख्यांसाठी एक कोटी ८० लाख रुपये, ५५०० बांबू बॅरिकॅडींगसाठी ४९ लाख ५० हजार रुपये, २ हजार मेडिकल बेडसाठी एक कोटी ८० लाख, २ हजार सिलिंडरचा पुरवठा आणि ते बसविणे यासाठी १ कोटी १० लाख मोजण्यात आल्याचे नमूद करण्यात आले आहे. अशी आणखी २० उदाहरणे त्यांनी दिली आहेत.