- मनीषा म्हात्रे, मुंबई
लहान-मोठ्या पार्ट्यांमधून तरुणाई अमलीपदार्थांच्या जाळ्यात ओढली जात असल्याचे धक्कादायक वास्तव अमलीपदार्थविरोधी पथकाने केलेल्या कारवाईत दिसून आले. त्यातच एमडीपाठोपाठ ‘एन बॉम्ब’चा मुंबईला धोका असल्याचे समोर येत आहे. त्या दिशेने अमली पदार्थविरोधी पथकाने कंबर कसली आहे. पार्ट्यांमध्ये अंमली पदार्थांचा सर्रास वापर होण्याच्या दृष्टीने मुंबई पोलिसांच्या अमली पदार्थविरोधी विभागासह गुन्हे शाखेने तस्करांवर कारवाई करण्यासाठी पथके तयार केली आहेत. अमलीपदार्थांच्या विक्रीची ठिकाणे, कोडवर्ड आणि रेव्ह पार्ट्यांची माहिती घेण्यासाठी फेसबुक, टिष्ट्वटर, व्हॉट्सअॅप आणि ईव्हेन्ट आॅर्गनायझर कंपन्यांच्या साइटसह अन्य सोशल नेटवर्किंग साइट व पंचतारांकित हॉटेल, रेस्टॉरंट आणि पब यांच्या आॅनलाइन बुकिंग साइटवर पोलिसांचे विशेष लक्ष असते.शहरातील कुलाबा, गिरगाव, मरिन लाइन्स, वरळी, दादर, वांद्रे, खार, जुहू, सांताक्रुझ, अंधेरी, ओशिवरा, मालाड, मढ, मार्वे, गोराई अशा उच्चभ्रू वस्तीत असलेले पब, रेस्टॉरंट आणि पंचतारांकित हॉटेलकडे तरुणाईला आकर्षित करण्यासाठी इव्हेन्ट कंपन्या स्वत:चे वेगळे पेज नेटवर्किंग साइटवर तयार करून पार्ट्यांचे आयोजन करतात. शहरातील अमली पदार्थांची तस्करी आणि विक्री यांच्यावर आळा घालण्यासाठी पोलिसांनी तस्करांवर प्रतिबंधक कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. पार्टीचे आयोजन करणाऱ्या इव्हेन्ट मॅनेजमेंट कंपन्यांकडून ‘रेव्ह पार्टी’ असा थेट उल्लेख न करता, वेगवेगळ्या प्रकारचे कोड वर्ड, शब्द वापरण्यात येतात. पार्टीला जाणाऱ्या इच्छुकांना ई-मेल द्वारे आणि आगाऊ रक्कम घेऊन प्रवेश देण्यात येतो. पार्ट्यांंमध्ये अमलीपदार्थांचा वापर होत आहे का, हे तपासण्यासाठी पोलिसांकडून एक डमी ग्राहक पाठविण्यात येतो. त्याची खात्री पटल्यानंतर या पार्टीवर कारवाई करण्यात येते. ब्राझील, आॅस्ट्रेलिया, युरोपमध्ये धुमाकूळ घातल्यानंतर, आता ‘एन बॉम्ब’ हे खतरनाक ड्रग्ज भारताच्या सीमेत दाखल झाल्याने खळबळ उडाली. नारकोटिक्स ब्युरोने नुकतीच गोवा आणि बंगळुरूमध्ये धडक कारवाई करत, काही ड्रग्स माफियांना अटक केली. त्यांच्याकडून ‘एन बॉम्ब’ हे खतरनाक ड्रग्स जप्त करण्यात आलेय, अशी माहिती नारकोटिक्स ब्युरोचे विभागीय संचालक कुमार संजय झा यांनी दिली.अवघ्या २५० ते ३०० रुपयांत विक्री...सुपरहिरोचा आभास निर्माण करणाऱ्या या ड्रग्सला पिंक सुपर मॅन, ब्ल्यू - बॅटमॅन, ब्लॅक-स्पाइडरमॅन, आ-२५ (क-२५) अशा अनेक नावाने ओळखले जाते. भारतात हे ड्रग्स २५० ते ३०० रुपयांत उपलब्ध होते. ही किंमत इतर ड्रग्सच्या तुलनेत तशी कमी आहे.पथकाकडून जनजागृती...मुंबईच्या अमली पदार्थविरोधी पथकाकडून २६ जून ते १० जुलैपर्यंत जनजागृती अभियान राबविण्यात येत आहे. शाळा, महाविद्यालयात भेट देऊन, पोलीस उपायुक्त जयंत नाईकनवरे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणार आहेत. कारवाईत अडथळाएन बॉम्बचा एक तुकडा जिभेवर ठेवताच नशा येते. स्वस्तात उपलब्ध असल्याने एलएसडीला पर्याय म्हणून पार्टीजमध्ये याचा वापर वाढताना दिसतोय. हे ड्रग्स जप्त जरी केले असले, तरी हे नाव नवे असल्याने, नार्कोटिक्स अॅक्टनुसार प्रतिबंधीत ड्रग्सच्या यादीतही याचा समावेश नाही. त्यामुळे कोणतीच कारवाई करता येत नसल्याच नारकोटिक्स ब्युरोचे म्हणणे आहे.मुलांकडे लक्ष द्या...आपली मुले कोणाच्या संगतीत आहेत, याची बहुतांश पालकांना कल्पना नसते. ते फक्त मुलांना लागेल तसा पॉकेटमनी पुरवतात. अशी मुले व्यसनांकडे वळण्याची शक्यता वाढते. काही उच्चभ्रू कुटुंबांमध्ये मुले आणि पालक एकत्र ड्रिंंक्स घेताना दिसतात. हे एक प्रकारे मुलांना व्यसनासाठी प्रवृत्त करणेच असते, असे म्हणता येईल. हल्ली तरुणींमध्येही व्यसनांचे प्रमाण वाढत आहे. आजवर उघडकीस आलेल्या रेव्ह पार्ट्यांमधून हे स्पष्ट झाले आहे. पाश्चात्त्य जीवनशैलीचा वाढता प्रभाव आणि एंजॉयमेंटच्या चुकीच्या कल्पना ही यामागील प्रमुख कारणे असल्याचे, अमली पदार्थविरोधी पथकाचे पोलीस उपायुक्त जयंत नाईकनवरे यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.