- अजय परचुरे मुंबई : आॅनलाइन शॉपिंगवर विविध सवलतींची आतषबाजी सुरू असल्याने आठवड्यावर येऊन ठेपलेल्या दिवाळीत आॅनलाइन खरेदीस ग्राहकांनी जास्त पसंती दिली आहे. आकर्षक सेल आणि घरच्या घरी मिळणाऱ्या वस्तू यामुळे दिवाळीच्या आधीच आॅनलाइन खरेदीत ४०० टक्क्यांनी वाढ झाल्याचा देशातील व्यावसायिक संघटनांचा अंदाज आहे.आॅनलाइन विक्री संकेतस्थळांकडून दिवाळीनिमित्त ग्राहकांसाठी विविध योजना जाहीर केल्या गेल्या आहेत. या विविध योजनांमध्ये आॅनलाइन कंपन्यांनी दिवाळीच्या मुहूर्तावर प्रत्येक उत्पादनावर किमान १० ते १५ टक्के किमती कमी केल्या आहेत. तसेच आॅनलाइन संकेतस्थळांवरून या वस्तू घरपोच मिळत असल्याने तसेच दिवाळीत नातेवाईक, मित्रांना दिवाळीची भेट म्हणून या वस्तू आॅनलाइन पाठवताही येत आहेत.सणासुदीच्या हंगामात आॅनलाइन खरेदीमध्ये मागील वर्षीच्या तुलनेत यंदा पाचपट जास्त वाढ दिवाळीच्या आठवड्याआधीच पाहायला मिळत आहे. अनेक प्रसिद्ध कंपन्यांचे कपडे, शृंगाराचे सामान, दागिने, भेटवस्तू, पादत्राणे अशा अनेक वस्तू संकेतस्थळांवरून खरेदी करण्यात येत आहेत. खरेदी केलेल्या वस्तू दोन ते तीन दिवसांतच ग्राहकांना घरपोच मिळत असल्याने ग्राहक आॅनलाइन खरेदीला पसंती देत आहेत. मोबाइल विक्रीतही विक्रमी वाढ झाल्याचे दिसून आले आहे. भरभरून मिळत असलेल्या सवलतींबरोबरच इंधनांच्या वाढलेल्या किमती आणि खरेदीसाठी असलेल्या असंख्य पर्यायांमुळे आॅनलाइन खरेदीचा कल वाढत आहे. त्यातूनही मोठ्या महानगरांमध्ये दुकानात जाऊन खरेदी करण्यामध्ये होणारी गैरसोय तसेच मुख्यत्वे सुरक्षेच्या कारणास्तव बहुतांश लोकांनी आॅनलाइन खरेदीलाच पसंती दिल्याचे दिसून आले आहे. भेटवस्तू, इलेक्ट्रॉनिक गॅजेट, कपड्यांच्या अॅक्सेसरीज, तयार कपडे, गृहोपयोगी वस्तू, लॅपटॉप खेळणी, दागिने, सौंदर्य उत्पादने, आरोग्य उत्पादने आदींची मोठ्या प्रमाणात विक्री होत आहे. आॅनलाइन खरेदीचे फायदे असून घरपोच सेवेमुळे वेळेची बचत, २४ तासांत कधीही खरेदी शक्य, गर्दीत न जाता घरच्या घरी सुलभ खरेदी, उत्पादनांची तुलना करणे शक्य आहे.यंदा बदलला खरेदीचा ट्रेंडदिवाळीच्या मुहूर्तावर सोने-चांदी आणि वाहन किंवा घरगुती वस्तू खरेदीकडे लोकांचा कल अधिक असतो; परंतु यंदा हा ट्रेंड बदलला असून अद्ययावत सॉफ्टवेअर असलेले मोबाइल हॅण्डसेट घेण्याकडे ग्राहकांचा कल अधिक दिसत आहे. लॅपटॉपनंतर आता टॅब्सची मागणी वाढली आहे. टॅब्स नेण्यासाठी अधिक सोयीस्कर असल्यामुळे या टॅब्सकडे युवकांचाही कल वाढत असल्याची माहिती आॅनलाइन दिवाळी खरेदीतून समोर आली आहे.
दिवाळीपूर्वीच आॅनलाइन खरेदीची आतषबाजी
By ऑनलाइन लोकमत | Published: October 26, 2018 5:58 AM