अल्झायमर जनजागृतीसाठी बृहन्मुंबई महानगरपालिका मुख्यालय इमारतीवर जांभळ्या रंगाची प्रकाशयोजना
By सचिन लुंगसे | Published: September 21, 2022 08:44 PM2022-09-21T20:44:56+5:302022-09-21T20:45:03+5:30
अल्झायमर आजाराविषयी जनजागृती करण्यासाठी दरवर्षी जगभरात २१ सप्टेंबर हा दिवस 'जागतिक अल्झायमर दिवस' म्हणून पाळण्यात येतो.
मुंबई: जागतिक अल्झायमर दिन (२१ सप्टेंबर) चे औचित्य साधून बृहन्मुंबई महानगरपालिका मुख्यालय इमारतीवर आज (२१ सप्टेंबर २०२२) सायंकाळी जांभळ्या रंगाची प्रकाशयोजना करण्यात आली आहे.
अल्झायमर म्हणजे सातत्याने विस्मरण होण्याचा अर्थात विसरभोळेपणाचा आजार होय. त्यास स्मृतिभ्रंश (डिमेन्शिया) असेही म्हटले जाते. मेंदूतील संरचनेमध्ये झालेल्या बदलामुळे हा आजार होवू शकतो. प्रामुख्याने वाढत्या वयामध्ये हा आजार आढळतो. महत्त्वाची माहिती लक्षात ठेवण्याची क्षमता कमी होणे, नवीन माहिती प्राप्त करता न येणे, नावे लक्षात ठेवताना किंवा शब्द आठवण्यात अडचण येणे, सतत विस्मरण होवून दैनंदिन कामांमध्ये गैरसोय होणे, वागणूक किंवा व्यक्तिमत्वात बदल होणे, दैनंदिन ओळखीच्या परिसरातही हरवणे आणि अशी साधर्म्य दाखवणारी इतर लक्षणे दिसू लागतात. यातून व्यक्ती म्हणून कार्यक्षमतेमध्ये व्यत्यय येऊ लागतात. असे लक्षणीय बदल होवून बिघडत जाणारे दैनंदिन जीवन किंवा कामकाज हे चिंताजनक ठरू लागते. संपूर्ण जगात अल्झायमरच्या रुग्णांची संख्या वाढत असून वैद्यकीय क्षेत्रासमोर ते एक आव्हान ठरु लागले आहे.
अल्झायमर आजाराविषयी जनजागृती करण्यासाठी दरवर्षी जगभरात २१ सप्टेंबर हा दिवस 'जागतिक अल्झायमर दिवस' म्हणून पाळण्यात येतो. या आजाराविषयी संशोधन सुरु असले तरी तो पूर्ण बरा करु शकेल, असे उपचार अजून उपलब्ध झालेले नाहीत. मात्र, या आजाराची लक्षणे वेळीच ओळखता यावीत, आजाराचे निदान झाल्यानंतर योग्य औषधोपचार व काळजी याआधारे तो नियंत्रित करता यावा म्हणून सामाजिक जाणीव निर्माण करण्यासाठी यंदा 'अल्झायमर ओळखा, डिमेन्शिया ओळखा' (Know Dementia, Know Alzheimer’s) ही संकल्पना राबवली जात आहे. जांभळा रंग हा अल्झायमर जनजागृतीशी संबंधित मानला जातो. त्यामुळे महानगरपालिका मुख्यालय इमारतीवर आज जांभळ्या रंगाची प्रकाशयोजना करुन अल्झायमर जनजागृतीचा संदेश देण्यात आला आहे.