पराभूत होऊनही नगरसेवक म्हणून मिरविण्यासाठी चुरस

By admin | Published: March 12, 2017 06:52 AM2017-03-12T06:52:33+5:302017-03-12T06:52:33+5:30

महापालिकेतील स्वीकृत नगरसेवकपदासाठीही जोरदार चुरस निर्माण झाली आहे. मतदारांनी नाकारलेले काही दिग्गजही या मागच्या दाराने महापालिकेत पुन्हा प्रवेश

Pursuing to win as a corporator even after losing | पराभूत होऊनही नगरसेवक म्हणून मिरविण्यासाठी चुरस

पराभूत होऊनही नगरसेवक म्हणून मिरविण्यासाठी चुरस

Next

मुंबई : महापालिकेतील स्वीकृत नगरसेवकपदासाठीही जोरदार चुरस निर्माण झाली आहे. मतदारांनी नाकारलेले काही दिग्गजही या मागच्या दाराने महापालिकेत पुन्हा प्रवेश करण्यास इच्छुक आहेत. त्यामुळे स्वीकृत नगरसेवकपदासाठी पाच राखीव जागांकरिता शिवसेना, भाजपा आणि काँग्रेसमध्ये चुरस आहे. निवडणुकीत पराभूत झाल्यानंतर पक्ष कोणाला पुन्हा संधी देणार याविषयी उत्सुकता आहे. विरोधी पक्षनेतेपदाचा तिढा सुटल्यानंतर स्वीकृतांची नावेही जाहीर होणार आहेत.
मुंबई महापालिकेत चार अपक्षांसह शिवसेनेचे ८८ संख्याबळ आहे, तर भाजपाचे ८२ नगरसेवक, अखिल भारतीय सेनेच्या गीता गवळी आणि मुमताज शेख या अपक्ष मिळून ८४ संख्याबळ आहे. तर काँग्रेसचे ३१ नगरसेवक निवडून आले आहेत. महापालिकेत सध्या २२७ नगरसेवक असून याव्यतिरिक्त पाच स्वीकृत सदस्यांची निवड केली जाते. त्यानुसार शिवसेना आणि भाजपाचे प्रत्येकी दोन आणि काँग्रेसच्या एका स्वीकृत सदस्याची निवड केली जाणार आहे.
युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे राजकारणात सक्रिय झाल्याने २०१२ मध्ये स्वीकृत नगरसेवकपदावर त्यांची छाप दिसून आली. त्यांचे प्राध्यापक अवकाश जाधव व अ‍ॅड. मेराज शेख यांची स्वीकृत नगरसेवकपदावर वर्णी लागली होती. मात्र या वेळेस शिवसेनेचे काही दिग्गज निवडणुकीत पराभूत झाल्यामुळे स्वीकृत नगरसेवकपद मिळवण्यासाठी त्यांचे प्रयत्न सुरू असल्याचे समजते. भाजपा आणि काँग्रेसमध्येही हेच चित्र आहे.
स्वीकृत नगरसेवकाचे अधिकार
स्वीकृत नगरसेवक कोणत्याही प्रभागाचे प्रतिनिधित्व करीत नसल्याने त्यांना महासभेत मतदानाचा अधिकार मिळत नाही. मात्र निवडून आलेल्या नगरसेवकांइतकाच त्यांना मान मिळतो. तसेच नगरसेवक निधी आणि इतर फायदे मिळतात. (प्रतिनिधी)

शिवसेनेची मर्जी कोणावर?
महापौरपद खुले झाल्यामुळे स्थायी समितीचे तत्कालीन अध्यक्ष यशोधर फणसे हेच महापौरपदाचे उमेदवार असल्याची जोरदार चर्चा सुरू होती. त्यांचे नाव जवळपास निश्चितच झाले होते. परंतु निवडणुकीत त्यांना पराभवाचा अनपेक्षित धक्का बसला. तसेच सभागृह नेत्या तृष्णा विश्वासराव, सुरेंद्र बागलकर यांचे नगरसेवकपदही थोडक्यात हुकले. त्यामुळे स्वीकृत नगरसेवकपदासाठी त्यांची नावे चर्चेत आहेत. यापैकी विश्वासराव आणि शिवसेनेचे प्रवक्ते अरविंद भोसले यांची नावे निश्चित झाल्याचे समजते.

भाजपातही अनेक दावेदार
मोदी लाटेचा फायदा जिथे नवख्या उमेदवारांना मिळाला तेथे भाजपाचे काही दिग्गज मोहरेही गळाले. यापैकी दोघांची वर्णी भाजपाकडून लागण्याची शक्यता आहे. या स्पर्धेत भाजपाचे माजी नगरसेवक व निवडणुकीत पराभूत झालेले प्रवक्ते भालचंद्र शिरसाट आणि मुंबई अध्यक्ष, आमदार आशिष शेलार यांचे बंधू विनोद शेलार यांचे नाव चर्चेत आहे. शेलार यांना महापालिका निवडणुकीत पराभवाचा सामना करावा लागला आहे.

दावेदार अनेक पद एक
काँगे्रसमध्येही असे अनेक इच्छुक असून विरोधी पक्षनेते प्रवीण छेडा, शीतल म्हात्रे यांचे नाव चर्चेत होते. परंतु दक्षिण मुंबई काँग्रेस युनिटचे प्रमुख सुनील नरसाळे यांचे नाव आता पुढे येत आहे.

नियम काय म्हणतो?
विविध विषयांतील तज्ज्ञांची नेमणूक स्वीकृत नगरसेवक पदावर व्हावी या उद्देशाने १९९७ मध्ये हे पद निर्माण करण्यात आले. राज्य सरकारच्या नियमावलीनुसार या पदावर एखाद्या बिगर शासकीय संस्थेचा पदाधिकारी अथवा एखाद्या क्षेत्रातील जाणकार, तज्ज्ञाची नेमणूक करावी.

Web Title: Pursuing to win as a corporator even after losing

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.