मुंबई : पश्चिम दुर्तगती महामार्गावर मालाड पूर्व येथील कुरार भुयारी मार्गाचे लोकार्पण आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले. मात्र कुरारच्या भुयारी मार्गासाठी शिवसेनेने सातत्याने प्रयत्न केले होते, अशी माहिती शिवसेना विधी मंडळ मुख्य प्रतोद व दिंडोशीचे स्थानिक आमदार सुनील प्रभू यांनी 'लोकमत'ला दिली. तर लोकमतने देखील गेली अनेक वर्षे हा विषय सातत्याने मांडून संबंधित प्रशासनाचे लक्ष वेधले होते.
कुरार गावाच्या नाहरिकांना मालाड स्टेशन गाठण्यासाठी चिंचोळ्या मार्गाने जावे लागत होते. तर वाहनांना वळसा घालून मालाड स्टेशन गाठावे लागत होते.तसेच येथील नागरिकांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत होता. त्यामुळे २०१४च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी जीर्ण झालेल्या या भुयारी मार्गाचे रुपडे पालटण्याचे आश्वासन सुनील प्रभू यांनी दिले होते. तसेच, या भुयारी मार्गाचे काम प्रथम पीडब्ल्यूडी खाते आणि त्यानंतर एमएमआरडीए प्राधिकरणासोबत पाठपुरावा करून मंजूर करून घेतले.
याप्रकरणी विधानसभेत अनेक वेळा आवाज उठवला होता. तर संबंधित अधिकाऱ्यां समवेत कामाचा आढावा घेण्यासाठी बैठका देखील घेतल्या होत्या. कोविड टाळेबंदी काळात आवश्यक त्या परवानग्या घेऊन काम सुरू ठेवले. आपल्या व शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या सततच्या पाठपुराव्यामुळे करार भुयारी मार्गाच्या रुंदीकरणाचा प्रश्न मार्गी लागला. त्यामुळे लाखो कुरारवासीयांना मालाड स्टेशमला जाण्यासाठी सलग सुसज्ज मार्ग मिळाला. आज सदर भुयारी मार्ग नागरिकांसाठी आज खुला झाला. यामुळे येथील लाखो नागरिकांना याचा फायदा होणार असल्याची माहिती आमदार सुनील प्रभू यांनी दिली.