Join us  

पुरुषोत्तम दारव्हेकर अभिवाचन स्पर्धा, ४ फेब्रुवारीला मुंबई केंद्राची प्राथमिक फेरी; राज्यभरात २१ केंद्रांवर रंगणार स्पर्धा

By संजय घावरे | Published: January 22, 2024 5:26 PM

नेहरूनगर कुर्ला येथील प्रबोधन प्रयोग घराच्या रंगमंचावर ही स्पर्धा होणार आहे.

मुंबई - मागील २२ वर्षांपासून चाळीसगाव येथील रंगगंध कलासक्त न्यासतर्फे आयोजित केली जाणारी 'पुरुषोत्तम दारव्हेकर अखिल भारतीय मराठी साहित्य अभिवाचन स्पर्धा' मुंबई केंद्रावर व्हिजन व्हॉईस एन अॅक्टच्या वतीने ४ फेब्रुवारीला आयोजित करण्यात आली आहे. नेहरूनगर कुर्ला येथील प्रबोधन प्रयोग घराच्या रंगमंचावर ही स्पर्धा होणार आहे.

या वर्षीची अभिवाचन स्पर्धा विशेषत्वाने एखाद्या व्यक्तीचे चरित्रकथन किंवा रहस्य किंवा गूढकथा या साहित्य प्रकारांमध्ये होणार आहे. वाचन संहिता सलग नाट्यात्म अनुभूती देणारी ठरणार आहे. मात्र यात नाटक वा एकांकिकेचे वाचन करता येणार नाही. कवितादेखील निवेदनाद्वारे संहितेच्या स्वरुपात बांधलेल्या असाव्यात. निव्वळ कवितांचे वाचन स्पर्धेमध्ये गृहीत धरले जाणार नाही. ४ फेब्रुवारी रोजी पूर्वप्राथमिक व प्राथमिक अशा दोन फेर्‍यांमध्ये ही स्पर्धा होणार असून, स्पर्धेसाठी निवडलेल्या संहितेतील 'सर्वोत्तम १० मिनिटे' वाचनाविष्कार पूर्वप्राथमिक फेरीमध्ये सादर करायाचा आहे. त्यातून सहा संघांची निवड प्राथमिक फेरीसाठी करण्यात येईल. प्राथमिक फेरीतील सादरीकरणाचा कालावधी २५ ते ३० मिनिटे असेल. 

प्राथमिक फेरीमधून विजयी होणार्‍या प्रथम दोन संघांना अंतिम फेरीमध्ये प्रवेश मिळेल. स्पर्धक कलाकारांची संख्या किमान दोन व कमाल पाच असायला हवी. या स्पर्धेमध्ये सर्वोच्च महत्व वाचिक अभिनयाला दिले जाणार आहे. या स्पर्धेमध्ये नेपथ्य, प्रकाशयोजना, रंगभूषा, वेषभूषा आदी घटकांना स्थान राहणार नाही. प्राथमिक फेरीमध्ये पाच वैयक्तिक वाचिक अभिनयाची प्रमाणपत्रे/स्मृतीचिन्हे देण्यात येईल. स्पर्धेबाबतची अधिक माहिती व प्रवेश अर्ज व्हिजन व्हॉईस एन अॅक्ट डॅाट कॅाम या संकेतस्थळावर आहे. अंतिम तारीख २ फेब्रुवारी आहे. वाचन चळवळ वृद्धिंगत करू पाहणार्‍या या स्पर्धेमध्ये अधिकाधिक संख्येने सहभागी होण्याचे आवाहन व्हिजनचे संचालक श्रीनिवास नार्वेकर व रंगगंधचे डॉ. मुकुंद करंबेळकर यांनी केले आहे. 

टॅग्स :मुंबई