टपाल तिकीट नमुना स्पर्धेत पुरुषोत्तम पवारने मारली बाजी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 25, 2019 02:03 AM2019-07-25T02:03:23+5:302019-07-25T02:03:27+5:30
विजेत्यांना स्वाती पांडे यांच्या हस्ते पारितोषिक : ‘अहिंसा परमो धर्म:’ आणि ‘जातीय सलोखा’ या दोन विषयांवर स्पर्धा
मुंबई : राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या १५० व्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त टपाल विभागामार्फत ‘अहिंसा परमो धर्म:’ आणि ‘जातीय सलोखा’ या दोन विषयांवर टपाल तिकिटांचा नमुना तयार करण्यासंबंधी स्पर्धा घेण्यात आली होती. या स्पर्धेत जे. जे. स्कूल आॅफ आर्ट्समध्ये शिक्षण घेत असलेल्या पुरुषोत्तम पवार यांनी प्रथम क्रमांक तर जातीय सलोखा या विषयामध्ये सहावीपर्यंत शिक्षण घेणारे विद्यार्थी गटात तिसरीत शिकणाऱ्या विहा शहा हिने तृतीय क्रमांक पटकावला. विजेत्या स्पर्धकांना टपाल विभागाकडून २५ हजार व १० हजार रुपये रोख बक्षीस देण्यात आले. टपाल खात्याच्या मुंबई विभागाच्या पोस्ट मास्टर जनरल स्वाती पांडे यांच्या हस्ते विजेत्यांना बक्षीस देण्यात आले.
जी.पी.ओ. सभागृहामध्ये झालेल्या या गुणगौरव समारंभास मुंबई विभागाच्या टपाल सेवा संचालक केया अरोरा, साहाय्यक संचालक वि. वि. नायक उपस्थित होते. विजेत्या स्पर्धकांच्या गुणगौरव समारंभासोबतच या वेळी फिलाटेली सेमिनार, प्रश्नमंजुषा स्पर्धा व फिलाटेली प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. स्टॅम्प संग्राहक उल्हास चोगले, गुणवंत शहा व सायरस सिधवा यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना ब्रिटिश राजवटीपासून ते आजपर्यंत टपाल विभागातर्फे छापण्यात आलेल्या वैविध्यपूर्ण टपाल तिकिटांबद्दल माहिती दिली व त्यांचे महत्त्व सांगितले. कार्यक्रमाला फोर्ट विभागातील बाई कबिबाई इंग्लिश मीडियम स्कूल, सर जे जे गर्ल्स हायस्कूल, सर जे जे बॉईज हायस्कूल आणि अंजुमन-आय-इस्लामचे अलाना इंग्लिश हायस्कूल या शैक्षणिक संस्थांमधील विद्यार्थी उपस्थित होते. उपस्थित विद्यार्थ्यांना टपाल विभाग, मुंबई क्षेत्र यांच्यातर्फे फिलाटेली किट भेटवस्तू म्हणून देण्यात आली. स्वाती पांडे यांनी कार्यक्रमाचा मुख्य उद्देश विद्यार्र्थ्यांमध्ये फिलाटेलीबद्दल जागरूकता निर्माण करणे तसेच टपाल विभागातर्फे राबविण्यात येणाºया पंडित दीनदयाल स्पर्श योजनेबाबत (शिष्यवृत्ती योजना) माहिती देऊन जास्तीतजास्त विद्यार्थ्यांना या शिष्यवृत्ती स्पर्धेत सहभागी होण्यासाठी उद्युक्त करणे हा असल्याचे सांगितले.