संगणक परिचालक मोर्चाच्या पवित्र्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 9, 2016 02:37 AM2016-04-09T02:37:43+5:302016-04-09T02:37:43+5:30
राज्यातील सुमारे २७ हजार संगणक परिचालक १२ एप्रिलला विधान भवनावर धडकणार असल्याची माहिती राज्य सचिव मयूर कांबळे यांनी दिली.
बिरवाडी : राज्यातील सुमारे २७ हजार संगणक परिचालक १२ एप्रिलला विधान भवनावर धडकणार असल्याची माहिती राज्य सचिव मयूर कांबळे यांनी दिली. गेल्या दोन वर्षांपासून संग्राम प्रकल्पातील २७ हजार संगणक परिचालक महाआॅनलाइन कंपनीविरोधात आंदोलन करत आहेत. वेळोवेळी आश्वासने देऊनही निर्णय न झाल्याच्या निषेधार्थ हा मोर्चा काढण्यात येईल.
गेल्या ४ वर्षांत ग्रामविकास विभागामार्फत महाआॅनलाइनकडून ग्रामपंचायत, पंचायत समिती व जिल्हा परिषदेमध्ये संगणक परिचालकांची मानधन तत्त्वावर नियुक्ती करण्यात आली होती. त्यांनी तीन वर्षांत संग्राम प्रकल्प देशात प्रथम क्र मांकावर नेला. तरीही महाआॅनलाइनने ४ वर्षांत मानधन, स्टेशनरीमध्ये शेकडो कोटी रु पये हडप केले आहेत. संगणक परिचालकांना ५०, २००, ५०० किंवा ३८०० रुपये असे तुटपुंजे मानधन दिले जात आहे. मानधन वेळेवर होत नसल्यामुळे चार संगणक परिचालकांनी आत्महत्या केल्या आणि राहुल चौखंद्रे यांचा नागपूर येथील हिवाळी अधिवेशनात ८ दिवस चाललेल्या आंदोलनात मृत्यू झाला. संगणक परिचालकांना जिल्हा परिषदेने १५ हजार रुपये किमान मासिक वेतन द्यावे या प्रमुख मागणीसाठी २ वर्षांपासून आंदोलने झाली. त्यात मुख्यमंत्री, ग्रामविकास मंत्री, ग्रामविकास राज्यमंत्री यांनी मागण्या मान्य करण्याचे वेळोवेळी लेखी व तोंडी आश्वासन दिले होते. नागपूर येथे ८ दिवस चाललेल्या आंदोलनावर पोलिसांचा लाठीचार्ज झाला होता तरीही आंदोलन चालू राहिले. त्या वेळी शासनाच्या वतीने ग्रामविकास मंत्र्यांनी २२ डिसेंबर २०१५ला आश्वासन देऊन १५ जानेवारी २०१६पर्यंत निर्णय देऊ असे सांगितले होते, परंतु एप्रिल आला तरी शासनाने कुठलाच निर्णय न घेतल्यामुळे राज्य संघटनेच्या निर्णयानुसार १२ एप्रिल २०१६ला मोर्चा काढण्यात येणार असल्याचे संघटनेचे राज्यसचिव मयूर कांबळे यांनी सांगितले आहे. (वार्ताहर)