केसरकर राजीनाम्याच्या पवित्र्यात
By admin | Published: October 13, 2015 11:13 PM2015-10-13T23:13:49+5:302015-10-13T23:27:25+5:30
सिंधुदुर्ग जिल्ह्यात जोरदार चर्चा : शिवसेनाअंतर्गत कलहाची किनार
सावंतवाडी : राज्याचे ग्रामविकास राज्यमंत्री व सिंधुदुर्गचे पालकमंत्री दीपक केसरकर हे सध्या राजीनाम्याच्या पवित्र्यात असल्याची जोरदार चर्चा सिंधुदुर्गात आहे. जिल्ह्यात शिवसेनेतील असलेला अंतर्गत कलह त्यांच्या राजीनाम्याचे कारण बोलले जात आहे. याबाबत गेले काही दिवस कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांमध्ये केसरकर यांच्याविरोधात ‘मातोश्री’वर जोरदार मोर्चेबांधणी सुरू होती.राज्य मंत्रिमंडळात शिवसेनेच्यावतीने अर्थ व ग्रामविकास राज्यमंत्री म्हणून शपथ घेतलेल्या दीपक केसरकर यांना सध्या सिंधुदुर्गात शिवसेनेच्या अंतर्गत राजकारणाने घेरले आहे. कार्यकर्ते व पदाधिकारी दीपक केसरकर यांच्या कार्यपद्धतीवर नाराज असून, त्यांनी वेळोवेळी याबाबत पक्षाचे वरिष्ठ नेते यांच्याकडे तक्रारी केल्या होत्या. याबाबत सिंधुदुर्ग जिल्ह्यात पालकमंत्री दीपक केसरकर यांना वगळून बैठकही पार पडली होती; तर दुसरी बैठक आठवड्यापूर्वी सिंधुदुर्गनगरीत होणार होती; पण त्याची वाच्यता सगळीकडे झाल्याने ती रद्द करण्यात आली होती.मात्र, खासदार विनायक राऊत यांनी स्वत: जिल्ह्यात येऊन शिवसेनेत असा कोणताही वाद नसल्याचा खुलासा करीत सारवासारवही केली होती. मात्र, शिवसेनेत सर्व काही आलबेल असल्याचे चित्र गेले तीन ते चार महिने सुरू आहे. या वादाची दखल खुद्द शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी घेतली असल्याचे बोलले जात आहे. याचा प्रत्यय दोन दिवसांपूर्वीच
आला. कणकवलाी नगरपंचायतीत संदेश पारकर यंना शिवसेना, तसेच भाजपने मदत केल्यानंतर पुन्हा एकदा पारकर यांची राणे विरोधक अशी प्रतिमा निर्माण करण्यात आली व त्यांचे खास अभिनंदन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केले होते.
मात्र, या सर्व प्रक्रियेपासून पालकमंत्री दीपक केसरकर हे लांबच होते. संदेश पारकर हे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये असल्यापासून दीपक केसरकर यांचे कट्टर विरोधक म्हणून पाहिले जात आहेत.
त्यामुळे शिवसेना आणि भाजप यांच्यातील अंतर्गत रुसव्या-फुगव्यात शिवसेनेचे सर्व मंत्री राजीनामा देण्याच्या पवित्र्यात असल्याने अर्थ व ग्रामविकास राज्यमंत्री दीपक केसरकर हे सुद्धा राजीनामा देतील, अशीच चर्चा सध्या जिल्ह्यात जोर धरू लागली आहे. (प्रतिनिधी)
राजीनामा वगैरे काही नाही : केसरकर
याबाबत सिंधुदुर्गचे पालकमंत्री दीपक केसरकर यांना विचारले असता त्यांनी, आम्ही असे कोणतेही राजीनामे देणार नाही, असे म्हणत राजीनाम्याच्या विषयाचे खंडन केले. मात्र, त्यांनी अधिक बोलण्याचे टाळले.