पुश-पूल इंजिन लावून ‘राजधानी’ धावली; प्रवाशांचा चांगला प्रतिसाद
By ऑनलाइन लोकमत | Published: February 14, 2019 03:23 AM2019-02-14T03:23:08+5:302019-02-14T03:23:23+5:30
मध्य रेल्वे मार्गावरील राजधानी एक्स्प्रेसचा वेग आणि क्षमता वाढविण्यासाठी पुश-पूल प्रकारातील विद्युत इंजिन लावून बुधवारी ती चालविण्यात आली.
मुंबई : मध्य रेल्वे मार्गावरील राजधानी एक्स्प्रेसचा वेग आणि क्षमता वाढविण्यासाठी पुश-पूल प्रकारातील विद्युत इंजिन लावून बुधवारी ती चालविण्यात आली. मध्य रेल्वे मार्गावर मेल, एक्स्प्रेसच्या पुढील आणि मागील बाजूस असे दोन विद्युत इंजिन लावून गाडी चालविण्याची ही पहिलीच वेळ आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते हजरत निजामुद्दीन मार्गावरून राजधानी एक्स्प्रेसने ऐतिहासिक धाव घेतली.
मध्य रेल्वे मार्गावरील राजधानी एक्स्प्रेसचे पहिल्या दिवसांपासून सर्वांनी स्वागत केले. प्रवाशांचा मिळणाऱ्या प्रतिसादामुळे राजधानी एक्स्प्रेसच्या डब्यांच्या संरचनेत बदल करून १६ ऐवजी २० डब्यांची एक्स्प्रेस चालविण्यात येत आहे. बुधवारी पुश-पूल पद्धतीने राजधानी चालविण्याने एक्स्प्रेसचा वेग, धावण्याची क्षमता वाढणार आहे. त्यामुळे वेळेची बचत होईल, असा विश्वास रेल्वे अधिकाºयांनी व्यक्त केला. बुधवारी दिल्लीकडे रवाना झालेली राजधानी प्रवाशांनी गच्च होती.
कसारा घाटाच्या कठीण चढावाच्या ठिकाणी राजधानी एक्स्प्रेसच्या पुढील आणि मागील बाजूस पूश-पुल पद्धतीचे इंजिन लावून एक्स्प्रेसला चढविण्यात येते. या इंजिनाच्या जोरावर राजधानी एक्स्प्रेसची क्षमता वाढून घाट मार्ग सुलभरीत्या पार करू शकते. बँकर इंजिन लावण्यासाठी जोडण्यासाठी आणि इंजिन काढण्यासाठी जास्त वेळ खर्ची जास्त असल्याने आणि जास्त क्षमता लागत असल्याने, हे इंजिन न लावता पुश-पूल इंजिन लावणे सोईस्कर झाले आहे.
२०, २३ फेब्रुवारीला एक्स्प्रेस २० डब्यांची
एसी १ टायरच्या एका डब्यात २४ प्रवासी, एसी २ टायरच्या पाच डब्यात २६० प्रवासी, एसी ३ टायरच्या ११ डब्यात ७९२ प्रवासी रवाना झाले आहेत. एकूण १ हजार ७६ प्रवासी मुंबईहून दिल्लीसाठी रवाना झाले आहेत. प्रवाशांची संख्या वाढणार असून, त्यांच्या सोयीसाठी २० डब्यांची राजधानी २०, २३ फेब्रुवारी रोजी चालविण्यात येईल. यामध्ये एसी २ टायरचे दोन डबे आणि एसी ३ टायरचे तीन जादा डबे जोडण्यात येतील.