मुंबई : मुंबई महापालिकेसाठी मंगळवारी ओबीसी आरक्षणाविना महिला प्रवर्गासाठी काढलेल्या आरक्षण सोडतीमुळे सत्ताधारी शिवसेनेसह भाजप, काँग्रेसच्या अनेक दिग्गज नगरसेवकांना धक्का बसला आहे. स्थायी समितीचे माजी अध्यक्ष यशवंत जाधव, बेस्टचे माजी अध्यक्ष आशिष चेंबूरकर, विरोधी पक्षनेते रवि राजा, भाजपचे गटनेते प्रभाकर शिंदे आदींचे प्रभाग महिला प्रवर्गात आरक्षित झाल्याने त्यांची अडचण झाली आहे. त्यांना नवे प्रभाग शोधावे लागणार आहेत.
‘हे’ सर्वपक्षीय नगरसेवक अडचणीत
शिवसेनेचे नगरसेवक अमेय घोले, मंगेश सातमकर, भाजपचे माजी गटनेते प्रभाकर शिंदे यांचे प्रभाग महिलांसाठी आरक्षित झाले आहेत. माजी स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांचा प्रभाग क्र. ११७, माजी महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांचा प्रभाग क्र. ९६ व काँग्रेसचे नेते रवी राजा यांचा प्रभाग सर्वसाधारण महिला आरक्षित झाला आहे. बेस्टचे माजी अध्यक्ष आशिष चेंबूरकर यांचा अनुसूचित जातीसाठी तर अनिल पाटणकर यांचा प्रभाग अनुसूचित जमातीसाठी राखीव झाला आहे. अमेय घोले, समाधान सरवणकर यांनाही दुसरा प्रभाग शोधावा लागणार आहे.
‘यांना’ दिलासा
माजी महापौर किशोरी पेडणेकर, राष्ट्रवादीच्या गटनेत्या राखी जाधव यांना मात्र सोडतीत दिलासा मिळाला आहे. पेडणेकर यांचा प्रभाग सर्वसाधारण गटासाठी खुला, तर जाधव यांचा प्रभाग महिला खुल्या प्रवर्गासाठी राखीव झाला आहे.
अळवणींचाही प्रभाग राखीव
भाजप आमदार पराग अळवणी यांच्या पत्नी ज्योती अळवणी यांचा प्रभाग क्रमांक ८५ हा अनुसूचित जातीसाठी आरक्षित झाला आहे. रवि राजा यांचा प्रभाग महिलांसाठी, तर भाजपच्या शीतल गंभीर यांचा प्रभागही आरक्षित झाला आहे. राष्ट्रवादीच्या राखी जाधव यांचा प्रभाग सर्वसाधारण महिलांसाठी राखीव झाला आहे.