मुंबई : राया मला पावसात नेऊ नका, राया मला जरतारी शालू आणा, आला पाऊस मातीच्या वासात, मैत्रिणींनो थांबा थोडं, खुशाल मागनं हसा, अगं पोरी संबाळ दर्याला तुफान आयलंय भारी अशी असंख्य लोकप्रिय ठरलेली गाणी आपल्या आगळ्या आवाजात गाणा-या गायिका पुष्पा पागधरे यांना गुरुवारी राज्य सरकारचा गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार जाहीर झाला. सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे यांनी ही घोषणा केली. ‘इतनी शक्ती हमें देना दाता...’ हे त्यांचे गाणेही खूपच गाजले.लता मंगेशकर यांच्या वाढदिवशीच हा पुरस्कार जाहीर करण्यात येतो. गायन व संगीत क्षेत्रात मोलाचे योगदान देणाºया कलाकारास हा पुरस्कार दिला जातो. रोख ५ लाख रुपये, मानपत्र, सन्मानचिन्ह असा हा पुरस्कार आहे. समितीने पुष्पा पागधरे यांच्या नावाची शिफारस केली.यापूर्वी हा पुरस्कार माणिक वर्मा, श्रीनिवास खळे, गजानन वाटवे, दत्ता डावजेकर, पं. जितेंद्र अभिषेकी, पं. हदयनाथ मंगेशकर, ज्योत्स्ना भोळे, आशा भोसले, अनिल विश्वास, सुधीर फडके, प्यारेलाल, रवींद्र जैन, स्नेहल भाटकर, मन्ना डे, जयमाला शिलेदार, खय्याम, महेंद्र कपूर, सुमन कल्याणपूर, सुलोचना चव्हाण, यशवंत देव, आनंदजी शहा, अशोक पत्की, कृष्णा कल्ले, प्रभाकर जोग, उत्तम ब्रीदपाल सिंग यांना प्रदान करण्यात आला आहे.पुष्पा पागधरे यांचाजन्म १५ मार्च १९४३ रोजी झाला, त्यांना संगीताचेधडे लहानपणी त्यांचे वडील जनार्दन चामरे यांच्याकडून मिळाले. पुष्पाताईंनीत्यांचे गुरु आर. डी. बेंद्रे यांच्याकडून शास्त्रीय संगीताचे शिक्षण घेतले. त्यानंतर मुंबईत येऊन गीत, गझल, भजन आणि ठुमरी हे सुगम संगीत सादर करण्यास सुरुवात केली.प्रसिद्ध संगीतकार रामकदम यांनी ‘देवा तुझी सोन्याची जेजुरी’ या चित्रपटात त्यांना प्रथम गायनाची संधी दिली. पुष्पातार्इंना राज्य शासनातर्फे पार्श्वगायनाबद्दल दोनवेळा पारितोषिके देऊन गौरविण्यात आले आहे. त्यांनी अनेक लावण्याही गायल्या आहेत.सुलोचना चव्हाण यांच्याप्रमाणेच त्यांच्या आवाजातील लावण्याही खूपच गाजल्या. त्यांनी मराठी, भोजपुरी, उडिया, बंगाली, मारवाडी, हरियाणवी, पंजाबी, गुजराती आणि आसामी भाषांमध्ये गाणी गायली आहेत.लतादीदींच्या नावाचा पुरस्कार मिळणे हे मी माझे भाग्य समजते. या क्षणी गुरूंची आठवण येत आहे. आजच्या जमान्यात संगीताची व्याख्या बदलली आहे. पूर्वीची गाणी कायम मनात राहायची. आताची गाणी मात्र कधी-कधी नकोशी होतात. - पुष्पा पागधरे
पुष्पा पागधरे यांना ‘गानसम्राज्ञी’ पुरस्कार, आगळ्या आवाजाचा झाला सन्मान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 29, 2017 5:49 AM