मुंबई : ज्येष्ठ लेखिका व पत्रकार पुष्पा त्रिलोकेकर-वर्मा यांचे शुक्रवारी पहाटे कांदिवली येथे राहत्या घरी निधन झाले. त्या ८५ वर्षांच्या होत्या. त्यांच्या पार्थिवावर डहाणूकरवाडी येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पती ज्येष्ठ पत्रकार प्रदीप वर्मा आहेत.
पुष्पा वर्मा यांनी पत्रकारितेची सुरुवात संयुक्त महाराष्ट्र चळवळीचे मुखपत्र दैनिक ‘मराठा’मधून केली. ‘मराठा’ बंद पडल्यावर सायंदैनिक ‘पहारा’च्या संपादकपदाची जबाबदारी त्यांनी स्वीकारली. त्यानंतर पत्रकारितेची दिशा दैनिकाकडून साप्तहिकाकडे वळविली. त्यांनी काही काळ ब्लिट्झमध्ये नोकरी केली. मग त्या मुक्त पत्रकार म्हणून लेखन करू लागल्या. साप्ताहिक श्री, साप्ताहिक लोकप्रभा, दैनिक प्रत्यक्ष, दैनिक कृषिवल, लोकमत, महाराष्ट्र टाइम्स, नवशक्ती, आदींच्या साप्ताहिक पुरवण्यांत कला, सांस्कृतिक विषयांवर त्यांनी लेखन केले. त्या बॉर्डरवर जाणाऱ्या पहिल्या महिला पत्रकार होत्या. ‘द्रौपदीची थाळी’ हे त्यांचे पाककृतींवरचे पुस्तकही अतिशय गाजले. प्रतिमाशास्त्र हाही पुष्पाबाईंच्या विशेष अभ्यासाचा विषय होता. ‘संस्कृती संवर्धन अभियाना’द्वारे या विषयाचे डॉक्युमेंटेशन करणाऱ्या विविध व्हिडिओ फिल्म्स तयार केल्या. पुष्पाबाईंनी प्रकाशनगरी काशी, देवांची जन्मकथा, पृथ्वीचे मारेकरी, गर्द अंधार, मिशन अंतरिक्ष ही पुस्तके लिहिली आहेत.