Join us

नियुक्तीसाठी आरटीओ इन्स्पेक्टर उमेदवारांचे बेमुदत धरणे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 30, 2018 1:08 AM

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने घेतलेली सहायक मोटर वाहन निरीक्षक पदाची भरती प्रक्रिया उच्च न्यायालयाने काहीच महिन्यांपूर्वी नियमबाह्य ठरविली होती.

मुंबई : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने घेतलेली सहायक मोटर वाहन निरीक्षक पदाची भरती प्रक्रिया उच्च न्यायालयाने काहीच महिन्यांपूर्वी नियमबाह्य ठरविली होती. त्यामुळे बाधित झालेल्या ८३२ उमेदवारांनी सोमवारी आझाद मैदानात बेमुदत धरणे आंदोलनास सुरुवात केली आहे. राज्य शासनाने तत्काळ पावले उचलत पात्र ठरलेल्या उमेदवारांना नियुक्त्या द्याव्यात, अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा संबंधित उमेदवारांनी दिला आहे.उच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे ८३२ उमेदवार देशोधडीला लागल्याची प्रतिक्रिया धरणे देण्यास बसलेल्या उमेदवारांनी व्यक्त केली आहे. राज्य शासनाच्या चुकीच्या निर्णयामुळे उमेदवारांवर ही वेळ आल्याचे एका उमेदवाराने सांगितले. आत्महत्येशिवाय दुसरा पर्याय उरला नसल्याचेही त्याने सांगितले. ‘लोकमत’शी बोलताना संबंधित उमेदवार म्हणाला की, आई-वडील ऊसतोड कामगार असताना, मोठ्या मेहनतीने एमपीएससीची परीक्षा उत्तीर्ण करत लग्न केले. मात्र, काहीच दिवसांत उच्च न्यायालयाने दिलेल्या निकालामुळे हाताशी आलेली शासकीय नोकरी गेली आहे. यासंबंधित न्यायालयीन लढाई लढण्यासाठी पत्नीचे मंगळसूत्रही गहाण ठेवले आहे. परिणामी, लग्नासाठी झालेला खर्च कसा फेडायचा आणि कुटुंब कसे चालवायचे, असा प्रश्न आहे.परीक्षा उत्तीर्ण झालेल्या ८३२ उमेदवारांपैकी बहुतेक उमेदवारांनी चांगल्या पगाराच्या खासगी कंपनीतील नोकरीला तिलांजली दिल्याचे आंदोलनकर्त्यांनी सांगितले. याउलट काही उमेदवारांनी या प्रक्रियेत दोन वर्षी खर्ची घातल्याने आता वयोमर्यादा ओलांडली आहे. त्यामुळे पुन्हा शासकीय नोकरी मिळणार नसल्याची व्यथा मांडली. परिणामी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, परिवहनमंत्री दिवाकर रावते यांनी तत्काळ या प्रकरणी उमेदवारांना दिलासा देण्याची मागणी आंदोलनकर्त्यांनी केली आहे.

टॅग्स :मुंबईआंदोलन