मुंबईसह इतर गर्दीच्या शहरांत फायर हेलिकॉप्टर ठेवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 1, 2019 05:57 AM2019-03-01T05:57:15+5:302019-03-01T05:57:17+5:30

लोकलेखा समितीची शिफारस : दहा हजार हायड्रंट्सचे तत्काळ पुनरुज्जीवन करा

Put fire helicopters in other crowded cities including Mumbai | मुंबईसह इतर गर्दीच्या शहरांत फायर हेलिकॉप्टर ठेवा

मुंबईसह इतर गर्दीच्या शहरांत फायर हेलिकॉप्टर ठेवा

Next

मुंबई : मुंबईसह गर्दीच्या शहरांमध्ये आगींवर नियंत्रणासाठी फायर हेलिकॉप्टर खरेदी करण्याची शिफारस विधिमंडळाच्या लोेकलेखा समितीने केली आहे. शिवाय, मुंबईत बंद असलेले ब्रिटिशकालिन दहा हजार फायर हायड्रंट्सचे पुनरुज्जीवन करणे आवश्यक असल्याचे समितीने म्हटले.


समितीचे अध्यक्ष गोपाल अग्रवाल यांनी हा अहवाल गुरुवारी विधानसभेत सादर केला. मुंबई, ठाण्यासारख्या शहरांमध्ये अनेकदा बहुमजली इमारतींना आग लागते. अरुंद गल्ल्या व दाट लोकवस्तीतून अग्रिशमन दलाच्या गाड्या पोहोचण्यात अडचणी येतात. अशात केवळ आग विझविण्याच्या कामासाठी एक हेलिकॉप्टर खरेदी करण्याची गरज असल्याचे समितीने म्हटले आहे. मुंबईत १० हजार ४७० फायर हायड्रंट्स आहेत. त्यापैकी केवळ १ हजार १३१ सुरू आहेत. झोपडपट्ट्या आणि फूटपाथमुळे झालेल्या अतिक्रमणांमुळे हे हायड्रंट्स दि२सतच नाहीत, अशी परिस्थिती अनेक ठिकाणी आहे. जे हायड्रंट्स सुरू आहेत, त्यात वस्तीत पाणीपुरवठा नसेल तर पाणीदेखील नसते. अशावेळी आग विझविण्यासाठी त्यांचा फायदा होत नाही, असे समितीने नमूद केले आहे. हे हायड्रंट्स बंद असल्याचा फटका गरीबनगर (२०११), मंत्रालय (२०१२) आणि लोटस नीलकमल; अंधेरी (२०१४) येथे लागलेल्या आगींदरम्यान बसला होता. मुंबईतील बहुमजली इमारतींमधील आगी विझविण्यासाठी पुरेशी व अद्ययावत यंत्रणा आजही अग्निशमन दलाकडे नाही याकडे समितीने लक्ष वेधले आहे.

चार प्रशिक्षण केंद्रे सुरू करावीत
महापालिका, नगरपालिकांमध्ये अग्रिशमन दलात नोकरीसाठी सहा महिन्यांचे प्रशिक्षण घेतलेले असणे अनिवार्य असते. असे प्रशिक्षण केवळ नागपूरच्या फायर इंजिनियरिंग कॉलेजमध्ये दिले जाते आणि इतक्या जणांना प्रशिक्षण तेथे देणे शक्य होत नाही. मुंबई, नागपूर, औरंगाबाद आणि पुणे विभागात चार प्रशिक्षण केंद्रे सुरू करावीत, असे समितीने म्हटले आहे.

Web Title: Put fire helicopters in other crowded cities including Mumbai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.