पाेलिसांचा इशारा; काेरोनाला समूळ नष्ट करण्यासाठी कडक कारवाई
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : कोरोना विषाणू समूळ नष्ट करण्यासाठी मुंबई महानगरपालिकेकडून उल्लेखनीय पावले उचलली जात असली तरी बहुतांश नागरिक नियम धाब्यावर बसवत असल्याचे चित्र आहे. अशा नागरिकांना अद्दल घडविण्यासाठी प्रशासन विविध उपाय करत असून, मास्क न घालणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जात आहे. ‘आता सोडतो आहे, पुन्हा सापडलात तर चौकीत नेणार’, असा इशाराही पाेलिसांकडून देण्यात येत आहे.
मुंबई शहर आणि उपनगरात पुन्हा एकदा कोरोनाचे रुग्ण वाढू लागले आहेत. परिणामी विनाकारण होणारी गर्दी, सामाजिक अंतर न पाळणे, मास्क परिधान न करणे अशाप्रकारे नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर मुंबई महापालिका आणि पोलीस कारवाई करत असून, जे नागरिक ऐकत नाहीत अशांना आता मुंबई पोलिसांकडून सज्जड दम दिला जात आहे.
विशेषतः मुंबईच्या पूर्व उपनगरांमध्ये मास्क परिधान न करणाऱ्या लोकांचे प्रमाण जास्त आहे. विनाकारण गर्दी करत सामाजिक अंतराचे नियम धाब्यावर बसवले जात आहेत. त्यामुळे अशा नागरिकांना अद्दल घडविण्यासाठी मुंबई पोलीस नाक्यानाक्यावर कारवाई करत आहेत. कुर्ला येथील बैल बाजार परिसरात माेठ्या प्रमाणावर कारवाई केली जात आहे. ‘आता सोडतो मात्र पुन्हा सापडलात तर पोलीस चौकीत नेवू, दोनशे रुपये वर आले आहेत का?’ असे विचारत कोरोनाचे समूळ उच्चाटन करण्यासाठी मास्क घालणे अत्यंत गरजेचे आहे, याची जाणीवही पाेलीस करून देत आहेत. मात्र, एवढी कारवाई करूनही मुंबई महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनी किंवा पोलिसांनी पाठ फिरवताच अनेकांकडून पुन्हा नियम धाब्यावर बसवले जात असल्याचे चित्र आहे.
..........................