गौरी टेंबकर-कलगुटकर
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : कोर्टात येणाऱ्या आरोपीकडून पळून जाणे, तसेच आत्महत्येचा प्रयत्न करण्याच्या प्रकारावर आळा घालायचा असेल तर बोरिवली कोर्टाच्या कॉरिडॉरमध्ये लोखंडी जाळ्या बसवा, अशी विनंती बोरिवली कोर्टातील वकिलांकडून करण्यात आली आहे. त्यासाठी एक लेखी पत्रही उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशांना देणार आहेत.
दिंडोशी पोलिसांनी बलात्कारप्रकरणी अटक केलेल्या एका आरोपीने २० मार्च रोजी कोर्टाच्या दुसऱ्या मजल्यावरून खाली उडी मारत आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. यात तो सुदैवाने वाचला आणि त्या प्रकरणाची नोंद बोरिवली पोलिसात करण्यात आली; मात्र हा पहिला प्रकार नसून, अनेकदा आरोपी कोर्टाच्या गॅलरीतून पळून जाण्याचा प्रयत्न करण्याच्यादेखील घटना घडल्या असल्याचे उच्च न्यायालयाचे वकील किशोर जोशी यांनी सांगितले. बऱ्याचदा एखाद्या आरोपीवर गुन्हा दाखल झाला तरी अनेक तांत्रिक कारणांमुळे खटला चालत नाही, शिक्षा होत नाही आणि सुटकादेखील होत नाही. यामुळे आरोपीची मानसिक स्थिती बिघडते. परिणामी असे प्रकार घडतात. त्यामुळे हे थांबविण्यासाठी बोरिवली कोर्टाच्या कॉरिडॉर तसेच अन्य आवश्यक ठिकाणी लोखंडी ग्रिल्स लावण्याचे काम करावे, अशी अॅड. जोशी यांची मागणी आहे. यात कोर्ट रूम क्रमांक २४ आणि ६७ यांचा प्रामुख्याने समावेश आहे . त्यासाठी त्यांनी उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशांना पत्रही लिहिले आहे.