मुंबई : लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीने आपल्याविरुद्ध फेक नरेटिव्ह सेट केले, आता असे नरेटिव्ह काँग्रेस आणि महाविकास आघाडीच्याच गळ्यात टाकण्याची वेळ आली आहे, आपल्याकडे मुद्दे भरपूर आहेत त्यावरून मविआला घेरा, आंदोलने करा आणि त्याचवेळी केंद्र सरकारने अलीकडे घेतलेले निर्णय लोकांपर्यंत पूर्ण ताकदीने पोहोचवा, असे आदेश भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी शनिवारी एका बैठकीत दिले.
राज्यातील भाजप नेत्यांची बैठक नड्डा यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सागर बंगल्यावर घेतली. यावेळी फडणवीस, केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव, पीयूष गोयल, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, रावसाहेब दानवे, पंकजा मुंडे आदी नेते उपस्थित होते.
गेल्या तीन महिन्यांत प्रदेश भाजपने केलेली आंदोलने, निवडणुकीच्या दृष्टीने केलेली तयारी या बाबतची माहिती नड्डा यांना यावेळी देण्यात आली. निवडणुकीच्या आधी प्रदेश भाजपने काय करणे अपेक्षित आहे ते नड्डा यांनी सांगितले. मोदी पंतप्रधान झाल्यानंतर घटना बदललेली नाही हे जनतेला जाऊन सांगा. त्याचवेळी कांदा, बासमतीवरील निर्यातमूल्य हटविणे, खाद्यतेलाच्या आयातीवर शुल्क आकारण्याचा केंद्र सरकारने काल घेतलेला निर्णय शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी अभियान राबविण्याचे निर्देश नड्डा यांनी दिले.
काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी आरक्षणाबाबत केलेल्या विधानावरून काँग्रेस आरक्षणविरोधी असल्याचे स्पष्ट होते, असे सांगून नड्डा म्हणाले की, आरक्षणाचा लाभ मिळत असलेल्या समाजापर्यंत पोहोचून कार्यकर्त्यांनी हे सांगितले पाहिजे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसापासून (१७ सप्टेंबर) सेवा पंधरवडा साजरा करण्याचा निर्णय भाजपने घेतला आहे. त्या काळात फेक नरेटिव्हवरून मविआला घेरले जाणार आहे.
निवडणुकीबाबत चर्चा
शिंदेसेना आणि अजित पवार गटाला सोबत घेऊनच आपल्याला निवडणुकीला सामोरे जायचे आहे.
जागावाटपात काही वाद झाले तरी त्याची कोणतीही जाहीर वाच्यता कोणीही करू नये, मित्रपक्षांच्या नेत्यांनाही ते सांगा, असे निर्देशही नड्डा यांनी दिले.