मुंबई: सल्लागार चुकीचे सल्ले देत असल्या प्रकरणी पालिका स्थायी समितीत बुधवारी तीव्र पडसाद उमटले. मुंबईतील रस्ते विकास कामांसाठी नियुक्त सल्लागारांकडून चुकीचे सल्ले देण्यात येत आहेत. लाखोंचे सल्ले देऊनही रस्त्यांची दुर्दशा होत असल्याने अशा सल्लागारांना जेलमध्ये टाका, अशी मागणी सर्वपक्षीय नगरसेवकांनी बुधवारी स्थायी समितीत केली.पालिका घाटकोपर येथील गारोडिया नगरमधील रस्त्यांची सुधारणा करण्याचा प्रस्ताव समितीत मंजुरीसाठी आला होता. या प्रस्तावात सल्लागारांनी केलेल्या रस्त्याचे अंदाजपत्र, आराखडा व संकल्पचित्रे असा उल्लेख करण्यात आल्याने सर्वपक्षीय नगरसेवकांनी त्यावर हरकत घेतली. सल्लागार प्रत्यक्ष ठिकाणी जाऊन सल्ला देतात का? त्यांच्या सल्ल्यानुसारच कामे होतात का? मुळात सल्लागारांच्या चुकीच्या सल्ल्यामुळे रस्त्यांची दुरावस्था झाली आहे, असा आरोप करत नगरसेवकांनी केला.अनेक ठिकाणी रस्त्यांची खोदकामे केली जातात, व नंतर ती तशीच पडून राहतात. त्यामुळे वाहतूक कोंडीतही भर पडते आहे. ठेकेदारांकडून रस्ते दुरुस्तीचे नियम धाब्यावर बसवले जात आहेत. परिणामी नागरिकांना प्रचंड मानसिक त्रास होतो, असे आरोप यावेळी करण्यात आले. सल्लागारांच्या संकल्प चित्रानुसार रस्त्यांची कामे होत नाहीत. रस्ते घोटाळ््यातील कंत्राटदार आणि अधिकाऱ्यांवर ज्याप्रकारे कारवाई झाली, त्यास्वरुपाची कारवाई सल्लागारांवर करावी, अशी जोरदार मागणी भाजपचे गटनेते मनोज कोटक यांनी केली. (प्रतिनिधी)
चुकीचे सल्ले देणाऱ्यांना तुरुंगामध्ये टाका
By admin | Published: April 20, 2017 3:09 AM