गौरी टेंबकर, लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: पूर्ववैमनस्यातून झालेल्या वादात सांताक्रुझ परिसरात गुरुवारी पेव्हर ब्लॉकने ३५ वर्षीय व्यक्तीवर हल्ला करण्यात आला. ज्यात त्याचा मृत्यू झाला. याप्रकरणी सांताक्रुझ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आल्या नंतर गुन्हे शाखेच्या कक्ष ९ ने जयशंकर मिश्रा (४८) याला अटक केली.
मयत व्यक्तीचे नाव राजेशकुमार शुक्ला (३५) असे आहे. तपास अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्ला याचे अँटॉप हिलचा रहिवासी असलेल्या आरोपीसोबत पूर्वी भांडण झाले होते. त्या रागातून मिश्राने काठी, पेव्हर ब्लॉक व छत्री याने शुक्लाला बेदम मारहाण केली. जखमी शुक्लाला तातडीने कुपर रुग्णालयात नेण्यात आले. मात्र तिथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. सुरक्षारक्षक मकरबहादुर सिंह याच्या तक्रारीवरून सांताक्रुझ पोलिसांनी याप्रकरणी हत्येचा गुन्हा दाखल केला. मुख्य म्हणजे ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली होती.
सांताक्रुझ पश्चिम परिसरातील एस.व्ही. रोडवरील डायग्नोस्टीक सेंटरसमोरील शुक्ला झोपले असताना त्यांच्यावर हल्ला करण्यात आला. याप्रकरणी सांताक्रुज पोलिसांसह कक्ष ९ प्रभारी पोलीस निरीक्षक दया नायक व पथकाने समांतर तपास सुरू केला. गुन्हातील पाहिजे आरोपी हा रेल्वेने किंग्ज सर्कल येथे येणार असल्याची माहिती नायक यांना मिळाली. त्यांच्या मार्गदर्शनाखाली कक्ष ९ च्या पथकाने किंग्ज सर्कल रेल्वे स्थानाकजवळून आरोपीला ताब्यात घेतले तेव्हा त्याने गुन्ह्याची कबुली दिली.