मुंबईआशिया खंडातील सर्वात मोठी झोपडपट्टी अशी ओळख असलेल्या धारावीतील एका घरात अजगर शिरल्याने धुमाकूळ उडाला होता. पण मुंबई पोलिसांच्या एका जिगरबाज हवालदाराने अजगराची सुटका केली आणि सर्वांचा जीव भांड्यात पडला.
'थर्टी फर्स्ट'चं सेलिब्रेशन सगळीकडे सुरू असतानाच धारावीत ६ फुटाच्या अजगरामुळे सर्वांची तारांबळ उडाली होती. धारावी पोलीस ठाणे परिसरातील वाय जंक्शन येथे राहणाऱ्या एका रहिवाशाच्या घरात हा अजगर शिरला होता. घराच्या कौलात अजगर वेटोळे घेऊन बसला होता. घटनेची माहिती वाऱ्यासारखी पसरली आणि मुंबई पोलिसांना फोन केला गेला.
मुंबई पोलीस दलात काम करणाऱ्या मुरलीधर जाधव यांनी जीवाची बाजी लावत या अजगराची सुटका केली. या थरारक सुटकेचा व्हिडिओ मुंबई पोलिसांनी ट्विट केला आहे. विशेष म्हणजे, मुरलीधर जाधव यांच्या उजव्या पायाला फ्रॅक्चर असतानाही त्यांनी कर्तव्यदक्षता दाखवत कोणत्याही नागरिकाला इजा न होऊ देता अजगराची सुटका केली. मुरलीधर यांनी अजगराला पकडून वनविभागाच्या मदतीने नैसर्गिक अधिवासात सोडले.
मुरलीधर यांच्या जिगरबाज कामाचे सर्वत्र कौतुक होतं आहे. अजगराला पाहण्यासाठी घटनास्थळी प्रचंड गर्दी झाली होती. अजगराची सुटका केल्यानंतर स्थानिकांनी टाळ्यांचा कडकडाट करत मुंबई पोलीस जिंदाबादच्या घोषणा दिल्या.