Join us

कैसर खालिद निलंबित; घाटकोपर होर्डिंग दुर्घटना भोवली, गृहविभागाची कारवाई 

By ऑनलाइन लोकमत | Published: June 26, 2024 6:23 AM

गृहविभागाची कारवाई, अधिकारांचा गैरवापर केल्याचा ठेवला ठपका

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: राज्याचे अतिरिक्त पोलिस महासंचालक (मानवाधिकार संरक्षण) कैसर खालिद यांना घाटकोपर होर्डिंग दुर्घटनाप्रकरणी गृह विभागाने मंगळवारी निलंबित केले. खालिद हे रेल्वे पोलिस आयुक्त असताना त्यांनी या अवैध होर्डिंगला परवानगी दिली होती. त्याच काळात त्यांच्या पत्नीच्या कंपनीच्या बँक खात्यात होर्डिंग उभारणाऱ्या कंपनीकडून लाखो रुपये जमा करण्यात आल्याची सध्या चौकशी सुरू असताना निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. 

होर्डिंग दुर्घटनाप्रकरणी अटकेत असलेल्या भावेश भिंडेच्या चौकशीमध्ये असे आढळले की त्याने मोहम्मद अर्शद खान या व्यक्तीच्या माध्यमातून कैसर खालिद यांची पत्नी सुम्मना खालिद यांच्या महापारा गारमेन्टस् प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीच्या बँक खात्यात ४६ लाख रुपये २०२२-२३ मध्ये जमा केले. सुम्मना आणि अर्शद खान हे महापारा कंपनीचे संचालक आहेत. जून २०२२ मध्ये ही कंपनी सुरू झाली होती. खालिद यांनी कृपादृष्टी केली त्या-त्या कंपन्यांनी त्यांच्या पत्नीच्या कंपनीच्या बँक खात्यात रकमा जमा केल्या का याचीही चौकशी आता सुरू झाली आहे. 

आदेशात काय?- कैसर खालिद यांच्या निलंबनाचा जो आदेश गृह विभागाने काढला आहे त्यात म्हटले आहे की, या प्रकरणात खालिद यांच्याविरुद्ध शिस्तभंगाची कारवाई करण्यात येत आहे.- होर्डिंगला परवानगी स्वतःच्या अखत्यारित देताना त्यांनी पोलिस महासंचालकांची मान्यता घेतली नव्हती. त्यांनी अधिकारांचा गैरवापर केला. होर्डिंग उभारण्याबाबतचे निकष, नियम यांची पायमल्ली केली गेली, असे पोलिस महासंचालकांच्या अहवालात आधीच म्हटलेले आहे.- संपूर्ण प्रकरणाची चौकशी सुरू असताना त्यांना निलंबित करण्यात येत आहे. निलंबनाच्या आदेशात खालिद यांच्या पत्नीच्या बँक खात्यात रक्कम जमा झाल्याचा मात्र उल्लेख नाही.

टॅग्स :मुंबईघाटकोपर