कैसर खालिद यांचा पाय आणखी खोलात; अर्शद खानच्या खात्यात पैसे ट्रान्सफर
By ऑनलाइन लोकमत | Published: July 22, 2024 05:54 AM2024-07-22T05:54:36+5:302024-07-22T05:54:47+5:30
खालिद यांनी फटाके विक्री व वितरणात तथाकथित भ्रष्टाचार केल्याच्या आरोपातही अर्शदचे नाव पुढे आले होते.
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : महाकाय होर्डिंगला मंजुरी दिल्यानंतर तत्कालीन पोलिस आयुक्त कैसर खालिद यांच्या सांगण्यावरून या प्रकरणातील संशयित अर्शद खानला इगो मीडियामधून धनादेश, तसेच पैसे ट्रान्स्फर केल्याचे भावेश भिंडेच्या चौकशीतून समोर येत आहे.
दुसरीकडे खालिद यांनी फटाके विक्री व वितरणात तथाकथित भ्रष्टाचार केल्याच्या आरोपातही अर्शदचे नाव पुढे आले होते. अर्शद हा गुन्हे शाखेच्या रडारवर असून, त्याला पुन्हा चौकशीसाठी बोलावण्यात आले आहे. मुळात यापूर्वी दादर येथे रेल्वे पोलिसांच्या ताब्यात असलेल्या जागेत होर्डिंग उभारण्याबाबत एका खासगी कंपनीने दिलेला प्रस्ताव खालिद यांनी महासंचालक कार्यालयाकडे पाठवला होता. मात्र, कार्यालयाने २०२२ मध्येच हा प्रस्ताव फेटाळला होता. दरम्यान, इगो मीडियाने घाटकोपर येथे होर्डिंग उभारण्याबाबत खालिद यांच्याशी चर्चा सुरू केली होती. महासंचालक कार्यालयातून परवानगी मिळणार नसल्याचे लक्षात येताच त्यांनी परस्पर परवानगी दिल्याचा अंदाज आता गुन्हे शाखेकडून व्यक्त केला जात आहे.
होर्डिंगबाबत पोलिस महासंचालक कार्यालयातून परवानगी घेतली नसल्याचे समोर येताच, अपघाताच्या सात महिन्यांआधीच लोहमार्ग पोलिस आयुक्त डॉ. रवींद्र शिसवे यांनी पोलिस महासंचालक कार्यालयास याबाबत पत्र लिहून ही बाब निदर्शनास आणून दिली होती. त्यानंतर पोलिस महासंचालक कार्यालयातून खालिद यांना नोटीसही बजावण्यात आली. मात्र, नोटीस मिळाली नसल्याचे खालिद यांनी चौकशीत सांगितले. एवढेच नाही तर परवानगी आदेश आणि संबंधित कागदपत्रांमध्ये खाडाखोड करत यात अडकवले जात असल्याचा दावाही त्यांनी केला. महत्त्वाच्या परवानगीवर त्यांच्याच स्वाक्षऱ्या आहेत.
खालिद यांनी सांगितल्यानेच...
होर्डिंगच्या परवानगीनंतर खालिद यांच्या सांगण्यावरून जान्हवी मराठेने इगोच्या खात्यातून अर्शद खानला काही धनादेश दिल्याचे भिडेने गुन्हे शाखेला सांगितले. परवानगी मिळाल्याच्या तीन महिन्यांत हे होर्डिंग उभे राहिले.
गुन्हे शाखा आता अर्शदच्या बँक खात्याचा लेखाजोखा तपासत असून, आतापर्यंत त्याच्या बँक खात्यात ६० लाखांहून अधिकचा व्यवहार झाल्याचे समोर आले. खालिद यांच्या पत्नी सुमाना यांची माहापारा नावाची कंपनी असून, अर्शद या कंपनीचा संचालक आहे.
तर ती दुर्घटना टळली असती...
• राज्य रेल्वे पोलिस दलात कार्यरत संजय भोर्डर या सहायक फौजदाराने २०२१ मध्ये खालीद यांच्या विरोधात तक्रार केली. तक्रारीनुसार ऑक्टोबर २०२१ मध्ये खालीद यांनी उमासन आणि खान एंटरप्रायझेस या दोन वितरकांकडूनच फटाके विकत घ्यावेत, अशी सक्ती केली.
फटाके वाहून नेताना अपघात घडला आणि पोलिस आयुक्तालयाचे वाहन जळून खाक झाले. या अपघातानंतर भोईर यांनी खालिद यांच्याविरोधात तक्रार दिली. या प्रकरणाची वेळीच चौकशी झाली असती, तर घाटकोपर होडिंग दुर्घटना टळली असती, असेही एका अधिकाऱ्याने सांगितले.