Join us

सचिन वाझेसह काझीची लवकरच खात्यातून हकालपट्टी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 05, 2021 4:09 AM

बडतर्फीचा प्रस्ताव अंतिम टप्प्यात; स्फोटक कार, मनसुख हत्या प्रकरण भोवणारजमीर काझीलोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : खाकी वर्दीआड ...

बडतर्फीचा प्रस्ताव अंतिम टप्प्यात; स्फोटक कार, मनसुख हत्या प्रकरण भोवणार

जमीर काझी

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : खाकी वर्दीआड गुन्हेगारी कृत्य करून मुंबई पोलीस दलाला बदनाम केलेल्या निलंबित सहाय्यक निरीक्षक सचिन वाझेसह त्याला सहकार्य करणाऱ्या एपीआय रियाजुद्दीन काझीची पोलीस दलातून हकालपट्टी केली जाणार आहे. बडतर्फीचा प्रस्ताव अंतिम टप्प्यात असून, येत्या काही दिवसांत त्यांना बडतर्फ केले जाईल, असे विश्वसनीय सूत्रांनी सांगितले.

दोघे सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत. त्यांच्यावरील प्राथमिक चौकशी जवळपास पूर्ण हाेत आली आहे. त्यामुळे भारतीय संविधान १९४९मधील व महाराष्ट्र नागरी सेवा अधिनियम कलम ३११मधील तरतुदीच्या अन्वये दोघांवर कारवाई होईल.

उद्योगपती मुकेश अंबानी यांचे निवासस्थान असलेल्या कारमायकल रोड परिसरात जिलेटीनच्या कांड्या असलेली स्काॅर्पिओ पार्क करून देशविघातक घातपाती कृत्य करणे, ठाण्याचे व्यावसायिक मनसुख हिरेन यांची हत्या करणे आणि त्याचा पुरावा नष्ट करण्याचे प्रयत्न करणे याबाबत दोघांविरुद्ध आयपीसी कलमांतर्गत गुन्हे दाखल आहेत.

स्फोटक कार प्रकरणी दाखल गुन्ह्यात मुंबई गुन्हे गुप्त वार्ता विभागाचा (सीआययू) तत्कालीन प्रभारी सचिन वाझे हाच सूत्रधार असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर एनआयएने १३ मार्चला त्याला अटक केली, त्यानंतर त्याला खात्यातून निलंबित केले. त्याचा तत्कालीन सहकारी काझी यात सहभागी असल्याने १० एप्रिलला त्यालाही अटक झाली. त्यानंतर दोन दिवसांनी त्यालाही निलंबित करण्यात आले.

* यामुळे होणार बडतर्फ

वाझे व काझी यांनी पदाचा गैरवापर करीत बेकायदेशीर कृत्ये करून पोलीस दलाची प्रतिमा मलिन केली. त्यामुळे महाराष्ट्र नागरी सेवा (शिस्त व सेवा) अधिनियम कलम ३११ अन्वये विभागीय चौकशीला अधीन ठेवून दोघांना खात्यातून बडतर्फ केले जाणार आहे.

* ...म्हणून पोलीस आयुक्तांना अधिकार

उपनिरीक्षक ते निरीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यांना खात्यातून बडतर्फ करण्याचे अधिकार पोलीस महासंचालकांना असतात. मात्र मुंबईचे आयुक्त पद हे महासंचालक दर्जाचे असल्याने मुंबई आयुक्त हेमंत नगराळे यांच्याकडून त्याबाबतचे आदेश जारी केले जाणार असल्याचे सांगण्यात आले.

* सुनील मानेही होणार बडतर्फ!

या प्रकरणात एनआयएने अटक केलेला तिसरा अधिकारी निरीक्षक सुनील मानेवरही बडतर्फीची कारवाई होणार आहे. मात्र त्याबाबतची प्रक्रिया प्राथमिक टप्प्यात आहे, त्यामुळे त्यावरील कारवाईला थोडा अवधी लागणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.

.....................