Join us  

क्वॉड्रिलॅटरल को-ऑपरेशनमुळे चीनविरुद्ध लढल्यास बळ मिळेल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 15, 2021 4:06 AM

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : अमेरिका, ऑस्ट्रेलिया, जपान आणि भारत यांच्यात क्वॉड्रिलॅटरल को-ऑपरेशनबाबत नुकतीच ऑनलाइन चर्चा करण्यात आली. चीनच्या ...

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : अमेरिका, ऑस्ट्रेलिया, जपान आणि भारत यांच्यात क्वॉड्रिलॅटरल को-ऑपरेशनबाबत नुकतीच ऑनलाइन चर्चा करण्यात आली. चीनच्या कुरापतींना सडेतोड उत्तर देण्यासाठी या चर्चेत महत्त्वपूर्ण घोषणा केली गेली. चारही देशांच्या सहकार्यामधून काय करण्यात येईल याबाबत चर्चेत माहिती देण्यात आली. या चर्चेमुळे भारताला एक प्रकारे चीनविरोधात विविध प्रकारे लढण्यासाठी मोठे बळच प्राप्त होणार आहे, असे मत निवृत्त ब्रिगेडियर हेमंत महाजन यांनी व्यक्त केले.

शनिवारी १३ मार्च रोजी स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाच्या स्ट्रॅटेजिक सेंटरने आयोजित केलेल्या ऑनलाइन व्याख्यानात ते बोलत होते.

चीन हा जगातील बलवान देशांपैकी एक आहे. चीनने भारतासोबत नेहमी आक्रमक पवित्रा घेतला आहे. त्यांच्या या कृतीमुळे भारताला अनेकदा त्रास झाला आहे. या चार देशांमध्ये झालेल्या क्वॉड्रिलॅटरल को-ऑपरेशनमध्ये भविष्यात युरोपातील तीन मोठे देश तसेच दक्षिण आशियातील काही देशही समाविष्ट होण्याची शक्यता आहे. चारही देशांच्या चर्चेत आर्थिक तसेच कोरोनावरील लस वितरण, लोकशाहीचा विकास, दळणवळण अशा विविध विषयांवर अनेक दिशा ठरवण्यात आल्या. यामुळे या देशांसोबत करण्यात आलेली मैत्री चीनच्या विरोधात लढण्यास अधिक बळ देईल.

चीनला लगतच्या दक्षिण चीन समुद्रात चीन करीत असलेल्या मनमानी याने आळा बसणार आहे. चीनमुळे दक्षिण-पूर्व आशियातील देश त्रासले आहेत. या संपूर्ण सागरावर चीन आपला अधिकार सांगत आहे. या चार देशांच्या चर्चेमुळे व घोषणेमुळे दबावगट तयार झाला आहे. या चर्चेत क्षमतावृद्धी, हवामानाबद्दल माहिती, तंत्रज्ञानाची देवाणघेवाण आर्थिक बाबी याबद्दल संयुक्तपणे सहकार्य करण्याचे घोषित केले आहे. अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडन हेदेखील चीनच्या विरोधात काम करण्यास तयार झाले आहेत. ही क्वॉड्रिलॅटरल को-ऑपरेशनमधील महत्त्वाची फलश्रुती असल्याचे ते म्हणाले.