Join us  

बोगस बियाणांवरून विधिमंडळात खडाजंगी, कृषीमंत्र्यांवर प्रश्नांची सरबत्ती

By ऑनलाइन लोकमत | Published: July 20, 2023 5:50 AM

बोगस बियाणांची विक्री आणि त्यांची आकडेवारी यासंदर्भात समाधानकारक उत्तरे न मिळाल्याने सत्ताधारी व विरोधकांमध्ये जोरदार खडाजंगी झाली.

मुंबई : बोगस बियाणांच्या विक्रीला आळा घालून शेतकऱ्यांची फसवणूक होऊ नये यासाठी कठोर कायदा करण्यात येईल व तो याच पावसाळी अधिवेशनात आणला जाईल, अशी घोषणा कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी बुधवारी विधानसभेत केली. पीक कर्जासाठी पात्र असलेला एकही शेतकरी वंचित राहणार नाही, अशी ग्वाहीदेखील मुंडे यांनी दिली. 

बोगस बियाणांची विक्री आणि त्यांची आकडेवारी यासंदर्भात समाधानकारक उत्तरे न मिळाल्याने सत्ताधारी व विरोधकांमध्ये जोरदार खडाजंगी झाली. त्यावरून विरोधकांनी सभात्याग केला. काँग्रेसचे आमदार विजय वडेट्टीवार यांनी यासंदर्भात तारांकित प्रश्न मांडला होता. 

राज्यात सुरू झालेल्या पावसाने सर्व पेरण्या ३१ जुलैपर्यंत पूर्ण होतील. मात्र, लांबलेल्या पावसामुळे जर दुबार पेरणीची वेळ आली तर सरकार या शेतकऱ्यांच्या मागे खंबीरपणे उभे राहील.        - धनंजय मुंडे, कृषिमंत्री

विरोधकांकडून प्रश्नांची सरबत्ती जागतिक बाजारपेठेत दर कमी झाले तर राज्यात का झाले नाहीत, बोगस टोळ्यांवर काय कारवाई केली, बोगस बियाणे विकणाऱ्यांवर गुन्हे दाखल झाले तर कारवाई काय केली, अशा प्रश्नांची सरबत्ती विरोधकांनी मुंडे यांच्यावर केली.

१६४ मेट्रिक टन बियाणे, १९० टन बोगस खते जप्त n १६४ मेट्रिक टन बियाणांचा साठा जप्त केला असून, २२ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. २० विक्रेत्यांचे परवाने रद्द तर १०५ विक्रेत्यांचे परवाने निलंबित केले आहेत. n खतांचा १९० टन साठा जप्त केला असून, १३ गुन्हे दाखल आहेत. ५२ विक्रेत्यांचे परवाने रद्द केले असून, २१० विक्रेत्यांचे परवाने निलंबित करण्यात आले आहेत, अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली.

टॅग्स :शेतकरीधनंजय मुंडे