मुंबई : धारावी पुनर्वसन प्रकल्पाच्या सेक्टर ५ चा पुनर्विकास म्हाडाच्या मुंबई मंडळामार्फत करण्यात येत आहे. या प्रकल्पातील क्लस्टर जे मधील झोपडीधारकांची पात्रता निश्चित करण्याचे काम म्हाडामार्फत सुरु आहे. आतापर्यंत २५८ रहिवाशांची पात्रता निश्चित झाली आहे. उर्वरित ४७ फायलींवर निर्णय प्रलंबित आहे.धारावीच्या पुनर्विकासासाठी राज्य शासनाने धारावी पुनर्विकास प्राधिकरणाची स्थापना केली आहे. प्राधिकरणामार्फत सेक्टर १ ते ४ चा पुनर्विकास करण्यात येणार आहे. तर सेक्टर ५ च्या पुनर्विकासाचे काम म्हाडाकडे सोपविण्यात आले आहे. त्यानुसार म्हाडाने क्लस्टर जे मधील डॉ. बाबासाहेब आंबेडकर शताब्दी नगरातील झोपडीधारकांची पात्र, अपात्रतेची प्रारूप यादी जाहीर केली आहे. ५२४ झोपडीधारकांच्या यादीतील २३३ झोपडीधारकांनी आवश्यक कागदपत्रे सादर न केल्याने म्हाडाने त्यांना अपात्र ठरवले होते.अपात्र आणि प्रलंबित प्रकरणांमधील झोपडीधारकांना आपल्या हरकती म्हाडाकडे नोंदविण्यासाठी मुदत वाढवून देण्यात आली होती. रहिवाशांनी हरकती नोंदविल्यानंतर म्हाडाने यामधील काही प्रकरणे मार्गी लावली असून आतापर्यंत २५८ रहिवासी पात्र ठरले आहेत. काही रहिवाशांनी चौथ्या किंवा पाचव्या मालकाकडून झोपडी खरेदी केली आहे. त्यामुळे सुमारे ५५ झोपडीधारकांना हस्तांतर शुल्क भरण्याची मुदत देण्यात आली होती. त्यामधील काही रहिवाशांनी शुल्क भरले आहे. (प्रतिनिधी)
सेक्टर ५मधील पात्रतेचे काम धिम्या गतीने
By admin | Published: January 05, 2016 2:40 AM