३,२५८ रिक्त पदांपैकी ७३ टक्के जागांवर पात्र शिक्षक उपलब्ध नाहीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 10, 2019 02:58 AM2019-08-10T02:58:36+5:302019-08-10T02:58:40+5:30
पहिल्या टप्प्यातील शिक्षक भरतीची निवड यादी जाहीर; इंग्रजी, गणित, विज्ञान विषयांसाठी शिक्षकांची पदे पहिल्या निवड यादीत रिक्त
मुंबई : राज्यात पवित्र संकेतस्थळाच्या गोंधळासह अनेक तांत्रिक अडचणींमध्ये खोळंबलेल्या बहुचर्चित शिक्षक भरतीची निवड यादी अखेर शुक्रवारी, ९ आॅगस्टला जाहीर झाली आहे. यामध्ये पवित्र प्रणालीद्वारे ५ हजार ८२२ पदांसाठी मुलाखतीशिवाय नियुक्तीकरिता प्राधान्यक्रम दिलेल्या शिक्षकांची निवड झाली असून ३ हजार २५८ पदे रिक्त राहिली आहेत. राज्यात २ वर्षांहून अधिक काळ रखडलेल्या शिक्षकभरतीला यानिमित्ताने सुरुवात झाल्याने शिक्षकांना मोठा दिलासा मिळाला आहे. शिक्षक भरतीतील पुढचा टप्पा म्हणजे मुलाखतीसह उमेदवारांची निवड यादी १६ आॅगस्टला प्रसिद्ध करण्यात येणार आहे. त्यासाठी शालेय शिक्षण विभागाने कंबर कसली आहे.
पहिल्या टप्प्यात एकूण ९०८० पदे ही मुलाखतीशिवाय भरतीसाठी उपलब्ध होती. त्यापैकी ६४ टक्के पदांसाठी निवड यादी जाहीर झाली आहे. तर ३५ टक्के पदे रिक्त राहिली आहेत. पवित्र प्रणालीद्वारे नोंदणी करण्यात आलेल्या अभियोग्यताधारक उमेदवारांची शैक्षणिक व व्यावसायिक अर्हता तसेच शिक्षणाचे माध्यम आणि रिक्त असलेल्या जागांचे माध्यम, विषय, पद, प्रवर्ग, समांतर आरक्षण या बाबी न जुळल्याने ३ हजार २५८ पदे रिक्त राहिली आहेत.
रिक्त राहणाऱ्या ३२५८ पदांपैकी २३९२ पदे ही उच्च प्राथमिक (६वी ते ८वी) या गटातील मुख्यत्वे इंग्रजी, गणित, विज्ञान विषयांकरिता अर्हताप्राप्त उमेदवार प्राप्त न झाल्याने रिक्त राहिली आहेत. मराठी माध्यमाच्या शाळांमधील २३११, उर्दू माध्यमाच्या ६९७, इंग्रजी माध्यमाच्या शाळांमधील २३७ पदांवर अर्हताप्राप्त उमेदवार उपलब्ध झाले नाहीत. महानगरपालिका हिंदी माध्यमाच्या शाळांमधील १३ पदे रिक्त राहिली आहेत. हिंदी व कन्नड माध्यमांच्या जिल्हा परिषदेच्या शाळांमधील भरतीसाठी उपलब्ध सर्व पदे म्हणजेच अनुक्रमे २७ व १३ रिक्त राहिली आहेत.
निवड यादीतील उमेदवारांच्या कागदपत्रांची पडताळणी १३ ते २१ आॅगस्टदरम्यान नियुक्ती प्राधिकाºयामार्फत करण्यात येणार आहे. सरकारी अनुदानित, खासगी अनुदानित, विना अनुदानित शाळांतील १२ हजार १४० पदांसाठी शिक्षक भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे. जवळपास गेल्या दीड ते दोन वर्षांपासून ही प्रक्रिया राबविण्यात येत आहे. मात्र, जागांची संख्या, आरक्षण, संकेतस्थळाच्या तांत्रिक अडचणी यात भरती प्रक्रिया रखडली होती. त्यामुळे शिक्षक होऊ इच्छिणाºया उमेदवारांकडून संताप व्यक्त करण्यात येत होता. या पार्श्वभूमीवर नवीन शिक्षणमंत्री आशिष शेलार यांनी प्रक्रियेला गती देऊन अखेर पहिली निवडयादी जाहीर केल्याने शिक्षक समाधान व्यक्त करीत आहेत.
निवड यादी जाहीर
झालेली पदे - ५८२२
जिल्हा परिषद - ३५३०
महानगरपालिका - १०५३
नगरपालिका- १७२
खाजगी प्राथमिक शाळा- १०६७
प्रवर्गनिहाय अर्हताप्राप्त उमेदवार उपलब्ध नसल्याने रिक्त जागा
अनुसूचित जाती - १२५८
अनुसूचित जमाती पेसा- ४४८
अनुसूचित जमाती - ३६९
इतर मागासवर्गीय - ३०१
एसईबीसी मागास - २३२
आर्थिकदृष्ट्या दुर्बल - १६१
खुला गट - ११६
भटक्या जमाती बी, सी व डी प्रवर्ग - २२७
विमुक्त जाती - ८१
विशेष मागास प्रवर्ग - ६५
शिक्षकी भरतीच्या पहिल्या यादीप्रमाणेच दुसºया टप्प्यातील निवडयादीमुळेही अभियोग्यता उमेदवारांना नक्कीच दिलासा देण्याचा प्रयत्न करणार आहे.
- आशिष शेलार, शालेय शिक्षण मंत्री