गुणनियंत्रण प्रयोगशाळा अत्याधुनिक करणार - दादाजी भुसे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2021 04:08 AM2021-06-16T04:08:49+5:302021-06-16T04:08:49+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : राज्यातील गुणनियंत्रण प्रयोगशाळांची दर्जावाढ करण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. त्यासाठी आवश्यक यंत्रसामग्री, नवीन तंत्रज्ञानाचा ...

The quality control laboratory will be modernized - Dadaji Bhuse | गुणनियंत्रण प्रयोगशाळा अत्याधुनिक करणार - दादाजी भुसे

गुणनियंत्रण प्रयोगशाळा अत्याधुनिक करणार - दादाजी भुसे

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : राज्यातील गुणनियंत्रण प्रयोगशाळांची दर्जावाढ करण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. त्यासाठी आवश्यक यंत्रसामग्री, नवीन तंत्रज्ञानाचा वापर, उपकरणांची आवश्यकता याबाबतचा प्रकल्प अहवाल १५ दिवसात सादर करण्याचे निर्देश कृषीमंत्री दादाजी भुसे यांनी मंगळवारी दिले. या प्रकल्पासाठी अतिरिक्त निधी विशेष बाब म्हणून उपलब्ध करून देऊ, असेही त्यांनी सांगितले.

राज्यातील गुणनियंत्रण प्रयोगशाळांच्या कामाचा आढावा कृषिमंत्र्यांनी मंत्रालयातील बैठकीत घेतला. यावेळी विभागाचे सचिव एकनाथ डवले, आयुक्त धीरज कुमार, गुणवत्ता नियंत्रण संचालक दिलीप झेंडे आदी अधिकारी उपस्थित होते. कृषिमंत्री भुसे म्हणाले, खरीप हंगामासाठी तपासणीसाठी येणारी खते, बियाणे यांच्या नमुन्यांची तपासणी विहित कालावधीत करावी. जेणेकरून बियाणे जर सदोष असेल तर त्याचा प्रत्यक्षात वापर टाळू शकतो. जेणेकरून शेतकऱ्यांचे नुकसान यामुळे होणार नाही. राज्यात गुणनियंत्रणाचे निकाल ऑनलाइन द्यावेत. त्याचबरोबर तपासणीसाठी नमुन्यांची क्षमता वाढवावी, असेही त्यांनी सांगितले.

राज्यात पुणे, परभणी, नागपूर येथे बीज परीक्षण प्रयोगशाळा असून पुणे, नाशिक, औरंगाबाद, अमरावती आणि कोल्हापूर अशा पाच ठिकाणी खत नियंत्रण प्रयोगशाळा आहेत. तर पुणे, ठाणे, औरंगाबाद, अमरावती या चार ठिकाणी कीटकनाशके चाचणी प्रयोगशाळा आहेत. जैविक कीडनाशके व जैविक खते प्रयोगशाळा अहमदनगर, औरंगाबाद, परभणी, नांदेड, जळगाव, धुळे, बुलडाणा, यवतमाळ, अमरावती आणि वर्धा अशा दहा ठिकाणी आहेत. तर कीडनाशके उर्वरित अंश तपासणी प्रयोगशाळा पुणे आणि नागपूर येथे आहे. या सर्व प्रयोगशाळांच्या माध्यमातून २०२०-२१ मध्ये सुमारे ६ कोटी २५ लाख ३९ हजार एवढा महसूल जमा झाला आहे. कृषी विभागाच्या संकेतस्थळावर प्रत्येक जिल्ह्यातील नावीन्यपूर्ण उपक्रम करणाऱ्या शेतकऱ्यांची यशकथा प्रसिद्ध करावी, असे निर्देश कृषिमंत्र्यांनी यावेळी अधिकाऱ्यांना दिले.

Web Title: The quality control laboratory will be modernized - Dadaji Bhuse

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.