Join us

सरकारपेक्षा खासगी संस्थांमध्ये दर्जेदार शिक्षण - नितीन गडकरी

By ऑनलाइन लोकमत | Published: October 23, 2018 4:40 AM

संस्था चालविणे किंवा व्यापार करणे हे सरकारचे काम नाही. धोरण ठरविणे इतकेच सरकारचे काम असायला हवे.

मुंबई : संस्था चालविणे किंवा व्यापार करणे हे सरकारचे काम नाही. धोरण ठरविणे इतकेच सरकारचे काम असायला हवे. सरकारी शाळा, विद्यापीठांपेक्षा खासगी संस्थामध्ये काकणभर अधिक चांगली सेवा मिळते हे वास्तव आहे. बिहारचे माजी राज्यपाल पद्मश्री डी. वाय. पाटील यांनी खासगी संस्था चालविताना सामाजिक जबाबदारीही पार पाडली, असे गौरवोद्गार केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सोमवारी काढले.डी. वाय. पाटील यांच्या ८४व्या वाढदिवसानिमित्त वरळी येथील नेहरू सेंटर सभागृहात नागरी सत्कार झाला. व्यासपीठावर माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील, माजी पंतप्रधान एच. डी. देवेगौडा, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, माजी केंद्रीय मंत्री सुशिलकुमार शिंदे, केेंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले, ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे, छत्रपती शाहू महाराज आदी मान्यवर उपस्थित होते.गडकरी म्हणाले की, वसंतदादा पाटील यांनी शिक्षण क्षेत्रात खासगी संस्थांना प्रवेश देण्याचा निर्णय घेतला तेव्हा टीका झाली. पण, डी. वाय. पाटील यांच्यासारख्या दूरदर्शी संस्थाचालकांनी हा आरोप खोटा ठरविला. त्यामुळे आता वैद्यकीय महाविद्यालयेसुद्धा खासगी संस्थांप्रमाणे चालविण्याचा सरकारचा मानस आहे. पवार म्हणाले की, दहा वर्षांच्या आमदारकीनंतर ते शिक्षण क्षेत्रात आले. विनाअनुदानित शाळा चालवितानाही समाजातील उपेक्षित आणि वंचित घटकाला न्याय मिळेल याची त्यांनी खबरदारी घेतली.एक रूपया मानधनावर राज्यपाल पदाचा भार सांभाळणारे, स्वत:च्या खर्चाने प्रवास करणारे डी. वाय. पाटील यांचा आदर्श राजकीय लोकांनी घ्यायला पाहिजे, असे सुशिलकुमार शिंदे यांनी सांगितले.या सत्काराला उत्तर देताना डी. वाय. पाटील यांनी त्यांच्या वाटचालीत सहकार्य केलेल्या प्रत्येकाचा विशेष उल्लेख करुन आभार मानले. टपाल खात्याने डी. वाय. पाटील यांच्यावर काढलेल्या तिकिटाचे अनावरण माजी राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांच्या हस्ते यावेळी करण्यात आले.>कर्नाटकी पगडी, शाल, धोतर जोडीडी.वाय.पाटील यांच्या सत्कारासाठी माजी पंतप्रधान देवेगौडा आवर्जुन उपस्थित होते. मात्र, तातडीच्या कामासाठी बंगळुरूला परत जावे लागणार असल्यामुळे अवघ्या दोन मिनिटांचे भाषण केले. निघण्यापुर्वी देवेगौडा यांनी खास कर्नाटकी पगडी, हार, शाल आणि धोतर जोडी देत डी.वाय.पाटील यांचा सत्कार केला. व्यासपीठावर अचानक सुरू झालेल्या या अनौपचारिक सोहळ्याला उपस्थितांनी जोरदार टाळ्यांनी दाद दिली.

टॅग्स :नितीन गडकरी