मुंबई: मराठी चित्रपटाना प्रोत्साहन देण्यासाठी, राज्य शासनाच्या वतीने दर्जेदार मराठी चित्रपट निर्मितीस अर्थसहाय्य योजना राबवली जाते. यावर्षीच्या अनुदानाचे वाटप सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते उद्या म्हणजेच ८ मार्च रोजी मंत्रालयातील समिती सभागृहात करण्यात येणार आहे.
शासनाने नियुक्त केलेल्या चित्रपट परीक्षण समितीने यंदाच्या अनुदानासाठी ४१ चित्रपटांना पात्र ठरवले आहे. यातील ०४ चित्रपटांना “अ” दर्जा तर “३३” चित्रपटांना “ब” दर्जा प्राप्त झाला आहे. तर ०४ चित्रपट विविध राज्य, राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त असल्याने त्यांना शासन धोरणानुसार अ दर्जा देऊन अनुदान वितरीत करण्यात येणार आहे. या कार्यक्रमासाठी अनुदानप्राप्त चित्रपटाचा चमू उपस्थित राहणार असल्याची माहिती महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी व सांस्कृतिक विकास महामंडळाने दिली आहे.
मराठी चित्रपटांना प्रोत्साहन किंवा त्यांना स्पर्धेमध्ये तग धरण्यासाठी लागणाऱ्या अर्थिक मदतीसाठी राज्यसरकारची ही अर्थसहाय्य योजना अत्यंत महत्त्वाची ठरते. त्याचबरोबर महाराष्ट्र सरकारकडून अनेक चित्रपटांना पुरस्कार देखईल दिले जातात. यामध्ये गेल्या काही दिवसांपुर्वीच राज्या सरकारने राज कपूर जीवनगौरव पुरस्कार व्ही. शांताराम जीवनगौरव आणि विशेष योगदान पुरस्कार यांची रक्कम दुप्पट करण्याची घोषणा केली होती.