रेल्वे प्रवाशांना उपलब्ध होणार मुंबई ग्राहक पंचायतीची दर्जेदार उत्पादने
By मनोहर कुंभेजकर | Published: June 18, 2023 07:04 PM2023-06-18T19:04:34+5:302023-06-18T19:04:51+5:30
केंद्र सरकारच्या 'वन स्टेशन,वन प्रॉडक्ट' या योजने अंतर्गत मुंबई ग्राहक पंचायत आपली खास दर्जेदार उत्पादने अत्यंत रास्त दरात रेल्वे प्रवाशांना उपलब्ध करुन देणार आहे.
मुंबई : केंद्र सरकारच्या 'वन स्टेशन,वन प्रॉडक्ट' या योजने अंतर्गत मुंबई ग्राहक पंचायत आपली खास दर्जेदार उत्पादने अत्यंत रास्त दरात रेल्वे प्रवाशांना उपलब्ध करुन देणार आहे. अंधेरी स्टेशन (पश्चिम)वर आजपासून १५ दिवसांसाठी तिखट, हळद, आंबोळी पीठ, थालीपीठ भाजणी, गोडा मसाला, गरम मसाला, मोदक पीठ, मूगडाल लाडू पीठ अशा वस्तु या स्टाॅलवर उपलब्ध असतील. तसेच अंधेरी येथील अंध संस्थेतील महिलांनी तयार केलेले डस्टर्स, नॅपकीन्स, कापडी पिशव्या सुद्धा या स्टाॅलवर विक्रीस ठेवण्यात आले आहेत. अंधेरी, विलेपार्ले आणि सा़ंताक्रूझ विभागातील कार्यकर्ते येते १५ दिवस सकाळी १० ते रात्री ८ पर्यंत हा स्टाॅल चालवणार आहेत.
अंधेरी (पश्चिम) रेल्वे स्टेशनवर मुंबई ग्राहक पंचायतीच्या
खास स्टाॅलचे उद्घाटन आज सकाळी ११ वा. अंधेरी स्टेशन प्रमुख श्री. मोरे यांच्या हस्ते संपन्न झाले. यावेळी संस्थेचे विश्वस्त आणि अंधेरी विभाग अध्यक्ष संजीव मंत्री आणि कार्याध्यक्ष अँड.शिरीष देशपांडे, कार्यवाह ज्योती मोडक व अनिता खानोलकर, कार्योपाध्यक्षा अनुराधा देशपांडे, शिक्षण विभाग प्रमुख मंगला गाडगीळ उपस्थित होते. अंधेरी, विलेपार्ले आणि सांताक्रूझ विभागातील अनेक कार्यकर्ते सुद्धा यावेळी उपस्थित होते. संस्थेच्या ज्येष्ठ कार्यकर्त्या सविता दोंदे आणि नीला म्हात्रे यांची ही उपस्थिती होती.
अनिता खानोलकर या रेल्वे प्रवासी समितीवर असुन त्यांच्या पुढाकाराने आपण हा उपक्रम हाती घेतला आहे. ज्योती मोडक, अनुराधा देशपांडे आणि मंगला गाडगीळ यांनी गेल्या काही दिवसांत परिश्रम पूर्वक अंधेरी, विलेपार्ले आणि सांताक्रूझ विभागातील कार्यकर्त्यांना एकत्र आणून या स्टाॅलचे नियोजन केले असून त्याला खरेदी अधिकारी प्रदीप रावराणे, कार्यालयीन कर्मचारी सचिन नाईक यांची मोलाची मदत लाभली आहे.
सकाळी अंधेरी स्टेशनवर मुंबई ग्राहक पंचायतीचे सर्व कार्यकर्ते स्टाॅल लावण्यात व्यस्त होते. विश्वस्त आणि अंधेरी विभाग अध्यक्ष संजीव मंत्री हे एका सर्वसामान्य कार्यकर्त्याप्रमाणे स्टाॅल सजावटीचे काम करत होते हे पाहून सर्वच कार्यकर्ते अचंबित झाले. सर्वच कार्यकर्त्यांचा उत्साह वाखाणण्याजोगा होता अशी माहिती अँड.शिरीष देशपांडे यांनी दिली.