- लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : आजमितीस तमाशातमोठा बदल झाला आहे, तमाशामध्ये असणारे वगनाट्यांचे प्रमाण कमी झाले आहे. तमाशातून सामाजिक प्रश्न मांडले जात नाहीत, असे का घडते याविषयी खंत व्यक्त करीत पुन्हा संशोधन करणार असल्याचे अभ्यासक संदेश भंडारे यांनी सांगितले. राज्याच्या कानाकोपऱ्यात तमाशा फडांसोबत दशकांहूनही अधिक काळापासून लावणीचा खेळ, कलाकारांचा बस्ता आणि या अवघ्या लोककलाप्रकाराचेच दस्तऐवजीकरण करणारे संदेश भंडारे यांचे अनुभव कथन रविवारी डॉ. भाऊ दाजी लाड वस्तुसंग्रहालय आयोजित म्युझियम कट्ट्यात मांडण्यात आले. त्या वेळी ते बोलत होते.तमाशा कलावंत खूप धाडसी असतात. तमाशातील बरेच कलावंत आपल्या नावात वडिलांचे नव्हे, तर आईचे नाव लावताना दिसतात. या कलावंतांमध्ये समोर येईल त्या परिस्थितीशी जुळवून घेण्याची तयारी असते, त्याची तुलना कोणाशीही करता येणार नाही, असेही भंडारे यांनी आवर्जून नमूद केले. भंडारे यांनी राज्यातील कोकण, मराठवाडा आणि विदर्भात आयोजित विविध यात्रा आणि जत्रांना भेटी दिल्या. छायाचित्रांच्या माध्यमातून या फडातील अनेक कलावंतांचे जगणे, सामाजिक आणि सांस्कृतिकदृष्ट्या उपेक्षित अशा या कलाकार वर्गाचे वास्तव त्यांनी पीपीटी सादरीकरणाद्वारे उलगडले. तमाशा कलावंतांचे एवढ्याशा अन्नात कसे भागत असेल म्हणून कलावंतांच्या जेवणाचे छायांकन केले, असे भंडारे यांनी सांगितले. तर ‘मीठ-भाकर’ हा शब्द गोष्टीत ऐकत आलो आहे. प्रत्यक्षात हे कलावंत मिठाबरोबर भाकरी खाताना पाहण्यास मिळाले, तेव्हा मीठ-भाकरीचे सत्य समजले, असे ते म्हणाले.कलगीतुरा, पश्चिम महाराष्ट्रातील एक पडदा लावून तमाशा, बैलगाडी तमाशा, विदर्भातील तमाशा, कोकणामध्ये पालखीच्या वेळी अंगणात होणारा तमाशा अशा तमाशाच्या विविध प्रकारांबद्दल भंडारे यांनी माहिती दिली. मे महिन्याच्या सुट्टीत तमाशा फड उभारले जातात, असे त्यांनी सांगितले. - तमाशाच्या फडामध्ये प्रत्येकाचे कुटुंब या कलेला वाहिलेले आहे, असे संशोधनात दिसून आले. पण काही ठिकाणी आजची पिढी कलेबरोबर शिक्षणाचा ध्यास घेत आहे, अशी माहिती भंडारे यांनी दिली. कलावंत म्हणून त्यांचे कौतुक केले जाते; पण, आजही त्यांच्याकडे माणूस म्हणून समाज पाहत नाही, ही या कलावंतांची शोकांतिका आहे.