मुंबई : मुंबई महानगरपालिकेच्या माहितीनुसार, २६ डिसेंबर रोजी युरोप व मध्य पूर्व देशातून एकूण ११ विमाने मुंबईत दाखल झाली आहे. त्यातून एकूण ८६८ प्रवासी आले, त्यातील ४७७ प्रवाशांना मुंबईत क्वारंटाइन करण्यात आले आहे. तर अन्य ३८५ प्रवाशांची त्या-त्या राज्यात रवानगी करण्यात आली आहे. तर सहा जणांना प्रक्रियेतून वगळण्यात आले आहे.
इंग्लंडमध्ये कोरोनाचा नवीन प्रकार आढळल्यामुळे २१ डिसेंबर २०२० पासून मुंबईत येणाऱ्या सर्व प्रवाशांची तपासणी व त्यांना क्वारंटाइन केले जात आहे. मात्र सावधगिरी म्हणून महिनाभराच्या कालावधीत मुंबईत आलेल्या परदेशी प्रवाशांचीदेखील तपासणी पालिकेने सुरू केली आहे. पालिकेच्या प्रत्येक विभाग कार्यालयातील दहा वैद्यकीय अधिकाऱ्यांचे पथक गुरुवारपासून त्या त्या विभागातील प्रवाशांच्या घरी जाऊन त्यांची तपासणी करीत आहेत.