शरद पवारांचा 'तो' एक फोन अन् ऑस्ट्रेलियाहून मायदेशी परतलेल्या क्रिकेटपटूंना क्वारंटिनमधून सूट
By कुणाल गवाणकर | Published: January 21, 2021 12:49 PM2021-01-21T12:49:19+5:302021-01-21T13:59:37+5:30
मुंबईत परतलेल्या खेळाडूंना थेट घरी जाण्याची परवानगी
मुंबई: ऑस्ट्रेलियाला ऑस्ट्रेलियात नमवून मायदेशी परतलेल्या भारतीय संघाचं जंगी स्वागत झालं आहे. सध्या कोरोनाचं संकट असल्यानं नियमांनुसार खेळाडूंना क्वारंटिन करण्यात येणार होतं. मात्र राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष आणि मुंबई क्रिकेट असोसिएशनचे सदस्य शरद पवार यांच्या मध्यस्थीमुळे टीम इंडियाच्या खेळाडूंना क्वारंटिनच्या नियमांमधून सूट देण्यात आली. त्यामुळे खेळाडूंना थेट घरी जाता आलं.
आज सकाळी साडे नऊ वाजता कर्णधार अजिंक्य राहणे, रोहित शर्मा, शार्दुल ठाकूर, पृथ्वी शॉ आणि प्रशिक्षक रवी शास्त्री यांचं मुंबई विमानतळावर आगमन झालं. मुंबई महापालिकेच्या कोरोना प्रतिबंधात्मक नियमावलीनुसार त्यांनी क्वारंटिन करण्यात येणार होतं. पण मायदेशी दाखल झालेल्या खेळाडूंना नियमांमधून सवलत देण्यात आली. खेळाडूंना क्वारंटिन न करण्याबाबत शरद पवार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना फोन केला. त्यानंतर ऑस्ट्रेलियातून विजय मिळवून मुंबईत परतलेल्या टीम इंडियाच्या खेळाडूंना क्वारंटिन न करण्याचा निर्णय झाला. मुख्यमंत्र्यांनी याबद्दल महापालिकेला आदेश दिले. त्यानंतर खेळाडूंची आरटीपीसीआर टेस्ट करुन त्यांना घरी जाण्याची परवानगी देण्यात आली.
Video : ढोल ताशांचा गजर, लेकीची गळाभेट... असं झालं अजिंक्य रहाणेचं मुंबईत जंगी स्वागत
पुढील महिन्यात भारत इंग्लंडविरुद्ध कसोटी मालिका खेळणार आहे. पहिला कसोटी सामना चेन्नईत होणार आहे. त्यामुळे पुढील काही दिवसांत भारतीय खेळाडू चेन्नईला जाणार आहेत. त्याआधी त्यांना कुटुंबासमवेत काही वेळ घालवायचा होता. परंतु परदेशातून आल्यामुळे नियमानुसार त्यांना क्वॉरंटिन करावे लागणार होतं. मात्र शरद पवार यांच्या मध्यस्थीनंतर खेळाडूंना क्वॉरंटिन न करण्याचा निर्णय घेण्यात आला.