व्यापाऱ्याच्या घरातून ४० तोळे सोन्याचे दागिने चोरणारी चौकडी जाळ्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2021 04:07 AM2021-02-23T04:07:46+5:302021-02-23T04:07:46+5:30
मुंबई : व्यापाऱ्याच्या घरातून ४० तोळे सोन्याचे दागिने चोरणाऱ्या चौकडीला गुन्हे शाखेने बेड्या ठोकल्या आहेत. त्यांच्याकड़ून २७ तोळे सोने ...
मुंबई : व्यापाऱ्याच्या घरातून ४० तोळे सोन्याचे दागिने चोरणाऱ्या चौकडीला गुन्हे शाखेने बेड्या ठोकल्या आहेत. त्यांच्याकड़ून २७ तोळे सोने जप्त केले आहे. गुन्हे शाखेच्या कक्ष १२ने ही कारवाई केली आहे.
अयप्पा सुब्रमण्यम शेट्टीयार ऊर्फ शेट्टी (४६), मुरगन सोकन शेट्टी (४४), नसिम हसन शेख (२१), जियारुल बाबर शेख ऊर्फ पिंटू (३८) अशी अटक करण्यात आलेेल्या आरोपींची नावे आहेत.
१७ फेब्रुवारी रोजी गोरेगाव पूर्वेकडील पांडुरंग वाडीतील फ्लॅट क्रमांक ६०१ मधून आरोपींनी १८ लाख किमतीचे ४०१ ग्रॅम सोने लंपास केले. संजय वेलणकर यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा नोंद करत तपास सुरू केला. गुन्हे शाखेच्या कक्ष १२ने ही समांतर तपास सुरू केला. यात, पथकाने चार जणांना बेड्या ठोकल्या आहेत. अटक आरोपी सराईत गुन्हेगार असून, यापैकी दोघांविरुद्ध ११ घरफोडीच्या गुह्यांची नोंद करण्यात आले आहेत.
यापैकी ज्ञानेश्वर शेट्टी आणि एकनाथ शेट्टी यांचा शोध सुरू आहे. ज्ञानेश्वर विरोधात ११ गुन्ह्यांची नोंद आहे तर एकनाथ विरोधात दोन गुन्ह्यांची नोंद आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपीकडून २७० ग्रॅम सोने आणि सात हजार रुपयांची रोकड जप्त करण्यास पथकाला यश आले आहेत. यात अयप्पा आणि मुरुगन यांनी साथीदारांच्या मदतीने ही चोरी केली. त्यानंतर नसिम आणि जियारूलच्या मदतीने त्याची विल्हेवाट लावल्याचे तपासात समोर आले असून, अधिक तपास सुरू आहे.