सचिन लुंगसे, मुंबई भायखळा येथील राणीची बाग म्हणून ओळखल्या जाणा-या महापालिकेच्या वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान व प्राणिसंग्रहालयातील प्रजा सध्या कमालीची त्रस्त झाली आहे. पक्ष्यांसह येथील प्राण्यांची व्यवस्थित काळजी घेतली जात नसून, ‘पॉज’ या प्राणीमित्र संघटनेने येथील त्रुटींचा अहवाल केंद्रीय प्राणिसंग्रहालय प्राधिकरणाला सादर केला आहे. महत्त्वाचे म्हणजे केंद्राने देखील ‘पॉज’च्या अहवालावर प्राणिसंग्रहालयाला योग्य पावले उचलण्याचे निर्देश दिले असून, याबाबत अद्याप काहीच योजना करण्यात आलेली नाही.वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान व प्राणिसंग्रहालयातील प्राण्यांसह येथील पक्ष्यांची निगा राखली जावी, म्हणून महापालिका सातत्याने प्रयत्नशील आहे. मात्र महापालिकेला यात म्हणावे तसे यश लाभत नसल्याचे चित्र आहे. आता तर ‘पॉज’ या प्राणीमित्र संघटनेने राणीच्या बागेतील त्रुटींचा पाढाच वाचला असून, त्यांनी आपला अहवाल केंद्रीय प्राणिसंग्रहालय प्राधिकरणासह चेन्नई येथील अॅनिमल वाइल्डलाईफ बोर्ड आॅफ इंडियाला देखील सादर केला आहे. शिवाय अॅनिमल वाइल्डलाइफ बोर्ड आॅफ इंडियाने पॉजचा अहवाल केंद्रीय प्राणिसंग्रहालय प्राधिकरणाला सादर केला आहे. प्राणीसंग्रहालयातील काही प्राण्यांचे पिंजरे तुटले आहेत. त्यांच्या तारांना गंज चढला आहे. काही पिंजरे रिकामे आहेत. आणि ज्या पिंजऱ्यांत प्राणी आहेत, त्यांची निगा नीट राखली जात नाही. कर्मचारी प्रशिक्षित नाहीत. प्राण्यांसाठीचे पाणी कमालीचे अशुद्ध आहे. पाण्याची पातळी कमी आहे. पर्यटकांकडून अस्वच्छता केली जाते ती वेगळी. पर्यटकांकडून प्राण्यांना खाण्यास दिले जाणारे पदार्थ आणि त्यामुळे होणारी अस्वच्छता, याबाबत सतर्कता दाखविली जात नाही. येथे वाहनाला प्रवेश दिला जाऊ नये, असे अपेक्षित आहे. मात्र दुचाकी वाहनांसह पालिकेची वाहनेच येथे वारंवार घुटमळत असल्याने प्राणीसंग्रहालयात प्रदूषणाची भरपडत आहे.प्राणिसंग्रहालयात येणाऱ्या पर्यटकांना प्राण्यांबाबत व्यवस्थित माहिती दिली जाईल, अशी व्यवस्था येथे उपलब्ध नाही. प्राण्यांच्या जनजागृती कार्यक्रमाबाबत पालिकेने कधी महत्त्वपूर्ण पाऊल उचलल्याचे ऐकिवात नाही, असे संघटना म्हणते. अनेक प्राण्यांच्या पिंजऱ्यांत उंदीर पकडण्यासाठीचे पिंजरे ठेवण्यात आले आहेत. अशा अनेक त्रुटींचा पाढा संघटनेने वाचला असून, तक्रार केल्यानंतर केवळ तात्पुरती उपाययोजना केली जात असल्याचे संघटनेचे पदाधिकारी सुनीश कुंजू यांनी सांगितले. (प्रतिनिधी)
‘राणी’ची प्रजा बनली त्रस्त!
By admin | Published: November 03, 2014 1:29 AM