'चौसष्ट घरांची राणी' आकांक्षाला 'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' सन्मान

By ऑनलाइन लोकमत | Published: April 10, 2018 06:05 PM2018-04-10T18:05:00+5:302018-04-10T18:05:00+5:30

आता आकांक्षाला वेध लागलेत ते ‘ग्रॅण्डमास्टर’ बनण्याचे. २०१७ मध्ये तिने उझबेकिस्तान (ताश्कंद) येथे झालेल्या आशियाई युवा स्पर्धेत १८ वर्षांखालील गटात दोन सुवर्णपदके आपल्या नावावर जमा केली आहेत. तिने नवी दिल्ली येथे झालेल्या राष्ट्रकुल स्पर्धेचे जेतेपदही मिळवले.

'Queen of the Fourth House' to be honored with 'Lokmat Maharashtran of the Year' award | 'चौसष्ट घरांची राणी' आकांक्षाला 'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' सन्मान

'चौसष्ट घरांची राणी' आकांक्षाला 'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' सन्मान

Next

मुंबईः संयम, चिकाटी आणि बुद्धिमत्तेची कसोटी पाहणाऱ्या बुद्धिबळाच्या खेळात देशातीलच नव्हे, तर आंतरराष्ट्रीय स्तरावरील प्रतिस्पर्ध्यांना चेकमेट करणारी पुण्याची आकांक्षा हगवणे ही 'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर 2018' पुरस्काराची मानकरी ठरली आहे. मनसे नेते बाळा नांदगावकर यांच्या हस्ते आकांक्षाचा आईने हा पुरस्कार स्वीकारला.

'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' पुरस्काराचं हे पाचवे पर्व आहे. राजकारण, समाजसेवा, कला, क्रीडा, प्रशासन, उद्योग अशा विविध विभागांमध्ये उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या शिलेदारांना हा पुरस्कार प्रदान केला जातो. मान्यवर परीक्षकांनी केलेलं मूल्यमापन आणि वाचकांचा कौल या आधारे हा विजेता निश्चित करण्यात येतो. वरळीच्या भव्य एनएससीआय डोममध्ये सुरू असलेल्या दिमाखदार सोहळ्यात आकांक्षाला सन्मानित करण्यात आलं.

 

‘चौसष्ट घरांची राणी’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुण्याच्या आकांक्षा हगवणेने बुद्धिबळामध्ये राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर आपला एक वेगळा दबदबा निर्माण केला आहे. २०१५ मध्ये आशियाई युवा बुद्धिबळ स्पर्धेत तिने १६ वर्षांखालील मुलींच्या गटामध्ये २ सुवर्ण आणि एक रौप्यपदक पटकावत ‘वुमन फिडे मास्टर’ हा किताब प्राप्त केला. २०१५ आणि २०१६ सलग २ वर्षे राष्ट्रकुल बुद्धिबळ स्पर्धेत मुलींच्या गटात सुवर्णपदकाला गवसणी घातली. या धडाकेबाज कामगिरीमुळे राज्य शासनाने तिला ‘शिवछत्रपती पुरस्कार’ देऊन नुकतेच गौरविले आहे. २०१६ मध्ये रशियात झालेल्या जागतिक स्पर्धेत तिने हा चमत्कार केला. याबरोबरच तिने ‘वुमन इंटरनॅशनल मास्टर’ हा किताबही पटकावला आहे. कमालीची ‘डाऊन टू अर्थ’ असलेली आकांक्षा १६ वर्षांखालील मुलींच्या गटातील ‘विश्वविजेती’ आहे, हे विशेष उल्लेखनीय.

आता आकांक्षाला वेध लागलेत ते ‘ग्रॅण्डमास्टर’ बनण्याचे. २०१७ मध्ये तिने उझबेकिस्तान (ताश्कंद) येथे झालेल्या आशियाई युवा स्पर्धेत १८ वर्षांखालील गटात दोन सुवर्णपदके आपल्या नावावर जमा केली आहेत. तिने नवी दिल्ली येथे झालेल्या राष्ट्रकुल स्पर्धेचे जेतेपदही मिळवले. याचबरोबर बोस्ना (बोस्निया) येथील ४७ व्या आंतरराष्ट्रीय खुल्या बुद्धिबळस्पर्धेत तिने विजेतेपदासह महिला ग्रॅण्ड मास्टरचा पहिला नॉर्मसुद्धा संपादन केला. आकांक्षाची वयाच्या सहाव्या वर्षी सुरुवात झाली ती मल्लखांबाने; पण पावसाळ्यात सरावासाठी बाहेर पडता येत नव्हते, घरातच थांबावे लागायचे. त्यामुळे घरात असताना बुद्धिबळ खेळण्यास सुरुवात केली. विरुद्ध खेळाडूंच्या चालीला प्रतिचाल करून, मात करण्यामध्ये आनंद वाटू लागला आणि आकांक्षाची बुद्धिबळ कारकीर्द सुरू झाली. महिला बुद्धिबळक्षेत्रात पुण्याचीच नव्हे, तर अवघ्या देशाची आशा-आकांक्षा असलेली ही १७ वर्षीय खेळाडू देशातील प्रतिभावान बुद्धिबळपटूंपैकी एक आहे. राज्य आणि राष्ट्रीय स्तरावर कायम दमदार कामगिरी करणाऱ्या आकांक्षाने २०१३ मध्ये वयाच्या अवघ्या १३ व्या वर्षी मुलींच्या गटात (पाँडिचेरी) पहिले राष्ट्रीय विजेतेपद आपल्या नावावर केले. यानंतर तिने कधी मागे वळून पाहिले नाही. प्रत्येक वर्षागणिक तिने आपल्या कामगिरीचा आलेख उंचावत ठेवला. नंतर तिने राष्ट्रीय स्तरावर १४; तसेच १७ वर्षांखालील मुलींच्या गटामध्ये विजेतेपद पटकावले. अनेक राष्ट्रीय शालेय स्पर्धांमध्येही आकांक्षाने विजेतेपद आपल्या नावावर केले आहे.

Web Title: 'Queen of the Fourth House' to be honored with 'Lokmat Maharashtran of the Year' award

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.