मुंबईच्या डबेवाल्यांना भेटून राणी खूश, नेदरलॅण्डची राणी मॅक्झिमा भारतात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 31, 2018 02:26 AM2018-05-31T02:26:13+5:302018-05-31T02:26:13+5:30
बुधवारी दुपारी अंधेरी स्थानकाबाहेर मुंबईतील डबेवाल्यांची लगबग होती.
अजय परचुरे
मुंबई : बुधवारी दुपारी अंधेरी स्थानकाबाहेर मुंबईतील डबेवाल्यांची लगबग होती. दरदिवशी खूप मेहनतीने मुंबईतील हजारो चाकरमान्यांना जेवणाचा डबा पोहोचविणाऱ्या मुंबईच्या डबेवाल्यांना एक खास व्यक्ती भेटायला आली होती. नेदरलॅण्डची राणी मॅक्झिमा सध्या भारत दौºयावर आहे. भारत दौºयावर येताच त्यांनी जगात प्रसिद्ध असलेल्या मुंबईच्या डबेवाल्यांची भेट घेण्याची इच्छा व्यक्त केली होेती. बुधवारी राणी मॅक्झिमा यांची ही इच्छा पूर्ण झाली. मुंबईच्या डबेवाल्यांची ही अनोखी कामगिरी पाहिल्यानंतर नेदरलॅण्डची राणीही प्रचंड खूश झाली.
नेदरलॅण्डची राणी मॅक्झिमा आपल्याला भेटायला येणार आहे याची माहिती डबेवाल्यांना एक दिवस आधी मुंबई पोलिसांकडून मिळाली होती. हातात कमी वेळ असूनही राणीच्या स्वागतासाठी डबेवाल्यांनी जय्यत तयारी केली होती. राणीचे अंधेरी स्थानक परिसरात आगमन झाल्यावर मुंबईच्या डबेवाल्यांनी पारंपरिक आणि मराठमोेळ्या पद्धतीने राणीचे स्वागत केले.
राणीने डबेवाल्यांची २० मिनिटे भेट घेतली. मुंबईच्या डबेवाल्यांचे काम कसे चालते. रेल्वेमधून प्रवास करीत मुंबईचे डबेवाले अचूक वेळेत आणि अचूक ठिकाणी डबे कसे पोहोचवितात याची इत्थंभूत माहिती राणीने डबेवाल्यांकडून या वेळी समजून घेतली. तसेच हा डबा ठेवण्याचा लाकडी बॉक्स कसा असतो आणि त्यात जेवणाचे डबे कसे ठेवले जातात याचे प्रात्यक्षिकही राणीसमोर सादर करण्यात आले. या वेळी राणीला डबेवाल्यांच्या लाकडी बॉक्सची प्रतिकृती भेट म्हणून देण्यात आली. या प्रसंगी मुंबई डबेवाला असोेसिएशनचे अध्यक्ष उल्हास मुके, डबेवाला असोसिएशनचे प्रवक्ते सुभाष तळेकर उपस्थित होते.